Tuesday 4 May 2021

आयर्न क्रिस्टल आकाराची अ‍ॅटोमियम बिल्डिंग


मुलांनो, तुम्ही तुमच्या विज्ञान पुस्तकात अ‍ॅटॉनिक क्रिस्टलचा फोटो पाहिला असेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, युरोपियन देश बेल्जियममध्ये 'अ‍ॅटोमियम' नावाची अशी एक इमारत आहे, ज्यामध्ये आयर्न क्रिस्टलचा आकार आहे. बेल्जियमची राजधानी असलेल्या  ब्रसेल्समधील ही 'अ‍ॅटोमियम बिल्डिंग'  लोखंडी क्रिस्टल आकारासाठी ओळखली जाते. 

निर्मितीचे कारणः 1958 मध्ये एका जागतिक प्रदर्शनानिमित्त कार्यक्रमाचे मुख्य मंडप आणि मुख्य आकर्षण केंद्र म्हणून अ‍ॅटोमियम इमारत ब्रुसेल्समध्ये बांधली गेली.  अभियंता आंद्रे वॉटरकिन, आर्किटेक्ट आंद्रे आणि जीने पोलक यांनी अ‍ॅटोमियम इमारतीची रचना ( डिझाइन) केली.

अद्वितीय रचना: अ‍ॅटॉमियमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अद्वितीय डिझाइन, जे आयर्न क्रिस्टल आकारावर आधारित आहे. ज्याप्रकारे  आयर्न क्रिस्टल्समध्ये अणू एका निश्चित पॅटर्नने जोडलेले असतात, त्याचप्रकारे या इमारतीमध्ये नऊ विशाल गोल (चेंडूच्या आकाराचे) अणूच्या रुपात दाखवले गेले आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की, त्यांचा आकार आयर्न क्रिस्टल्सपेक्षा 165 अब्ज पट मोठा आहे.  अ‍ॅटोमियममधील प्रत्येक क्षेत्राचा व्यास 18 मी. गोल आणि  तीन मीटर व्यासासह 12 नळ्यां (ट्यूब) द्वारे जोडलेले आहेत. या नळ्यांमध्ये एस्केलेटर्स बसवले आहेत. ज्यांच्या मदतीने एका गोलाकडून दुसर्‍या गोलाकडे जाता येते. अ‍ॅटॉमियम इमारतीत सध्या उपलब्ध असलेल्या नऊपैकी सहा गोल पर्यटकांसाठी खुले आहेत. बिल्डिंगचे गोल खूप मोठ्या आकारात बनवले गेले आहेत. प्रत्येक गोलामध्ये तीन मजले आहेत.  दोन मजले पर्यटकांसाठी आहेत तर तिसरा मजला राखीव आहे.  इमारतीच्या मध्यवर्ती ट्यूबमध्ये एक लिफ्ट आहे, जी इमारतीच्या सर्वात उंचीवर असलेल्या गोलाकडे जाते.  अ‍ॅटोमियमची मूलभूत रचना लोखंडाची बनलेली आहे. इमारतीची एकूण उंची सुमारे 102 मीटर आहे आणि वजन सुमारे 2 हजार 400 टन आहे. 

होतात अनेक उपक्रम: याठिकाणी नेहमी प्रदर्शन, मैफिली, कार्यक्रम, पार्ट्या आणि परिषदांचे आयोजन होत असते. सर्वात वरच्या गोलामध्ये एक रेस्टॉरंटदेखील आहे. नऊ चेंडूं (गोल) पैकी एक गोलात लहान मुलांसाठी अनेक मनोरंजनपर उपक्रम होत असतात.

नवे स्वरूप मिळाले:  2004 मध्ये ही इमारत नूतनीकरणासाठी काही काळ बंद होती. या दरम्यान एटोमियम बिल्डिंगच्या बाहेरील संरचनेमध्ये असलेल्या अल्युमिनियम शिटच्या जागी स्टेनलेस स्टील शीट बसवण्यात आली. तसेच इमारतीला 'एलईडी लाईटस्' डेकोरेट करण्यात आले. 14 फेब्रुवारी 2006 पासून ही अ‍ॅटोमियम इमारत पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.

लोकप्रियता वाढली: अ‍ॅटोमियम इमारत सहा महिन्यानंतर काढली जाणार होती. परंतु 1958 च्या प्रदर्शनात ती खूप लोकप्रिय झाली आणि त्यानंतरही ती पाहायला जगभरातून लोक येऊ लागले. त्यामुळे ती इमारत हटविण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आज ही अ‍ॅटोमियम बिल्डिंग बेल्जियम देशाच्या  ऐतिहासिक स्थळांमध्ये समाविष्ट आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment