Saturday 15 May 2021

राम वनवासातील स्थळे


भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात दोनशेपेक्षाही अधिक ठिकाणी निवास केला होता,असे तज्ज्ञांनी शोधले आहे. अयोध्येपासून वीस किलोमीटरवर तमसा नदी आहे. तिथेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. प्रयागराजपासून वीस किलोमीटरवर श्रृंगवेरपूर तीर्थ आहे. सध्या त्याला सिंगरौर असे म्हटले जाते. इथेच श्रीरामाचे मित्र निषादराज गुह राहत होते. सिंगरौरच्या कुरई येथे श्रीराम राहिले होते व येथूनच निषादराजाने त्यांना नौकेतून गंगापार नेले होते. कुरईतून श्रीराम प्रयागला आले होते. मंदाकिनी नदीच्या काठी चित्रकुटावर श्रीरामांनी निवास केला होता. इथेच भरतभेट झाली होती. नदीच्या एका घाटावर त्यांनी पिता दशरथांच्या नावे तर्पण केले होते. सतना येथे अत्रीऋषींचा आश्रम होता. तिथेच अत्रीपत्नी अनसुया मातेने सीतेला पतिव्रता धर्माचा उपदेश करून काही भेटवस्तू दिल्या होत्या. रामायणकालीन दंडकारण्याचा भाग सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील काही भागापर्यंत होता. तिथे श्रीरामांनी दहा वर्षे निवास केला. नाशिक येथे गोदावरीजवळील पंचवटीत निवास करीत असतानाच शुर्पणखेचे नाक कापण्यात आले होते व तिथेच सीताहरण घडले. आंध्र प्रदेशच्या खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम येथे पर्णशाला हे ठिकाण आहे. तिथेही श्रीरामाचा निवास घडला होता. सीतेच्या शोधात तुंगभद या आणि कावेरी नदीच्या काठीही श्रीराम व लक्ष्मण गेले होते. ऋष्यमुक पर्वतावर श्रीरामांची सुग्रीव व हनुमानाशी भेट झाली. कोडीकरई येथून वानरसेनेने रामेश्वरकडे कूच केले. रामेश्वरम येथेच लंकेत जाण्यापूर्वी श्रीरामांनी शिवाराधना केली होती. धनुषकोडीपासून रामसेतूचा प्रारंभ होतो. श्रीलंकेत नुवारा एलिया पर्वतावरच रावण धबधबा, रावण गुंफा, अशोक वाटिका, विभिषण महाल आदी स्थळे आहेत. नुवारा एलिया पर्वतापासून भव्य सुमारे ९० किलोमीटरवर फिरतेस बांद्रवेलाजवळ रावणाचा महाल होता असे मानले जाते.


No comments:

Post a Comment