Friday 28 May 2021

सव्वाशे मुलांचा बाप:शंकरबाबा पापळकर


 अनाथांचा नाथ अशी ओळख असलेल्या शंकरबाबा पापळकर यांना नुकतीच मानद डी.लिट.पदवी मिळाली आहे. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने शंकरबाबांना हा सन्मान दिला आहे. शंकरबाबा पापळकर हे अनाथ आणि दिव्यांग मुलांचे आधारवड आहेत. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. भारतातील हे अशाप्रकारचे एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. सध्या वसतिगृहात 98 मुली आणि 25 मुले असे एकूण 123 मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित वास्तव्य करत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बऱ्हाणपूर रस्त्यावर असलेल्या वझ्झर फाट्याजवळ सुमारे 25 एकरांच्या हिरव्यागार पहाडावर पापळकरांनी 'अपंगांची काशी' उभी केली आहे. 1 मे 1993 ला गोपाला शिक्षण संस्था या नावानं पापळकरांनी हे काम सुरू केलं. ते सुरू करावं यासाठी त्यांना कुणी प्रेरणा दिली,ते सांगणं मोठं कठीण आहे. पण शंकरबाबा हे मुळातले संत गाडगेबाबांच्या वंशातले आहेत. सेवेचा वसा त्यांच्याकडे तिथूनच आला असावा. त्यांचे मूळ गाव अचलपूर. पारंपारिक व्यवसाय धोब्याचा. अचलपूरमधलं त्यांचं घर गरिबीच्या सर्व खुणा मिरवणारे. अमरावतीत त्यांचं 'देवकीनंदन गोपाला' नावाचं एक मासिक होतं. त्याचे ते संपादक होते. पत्रकाराच्या नजरेतून समाजातल्या समस्यांकडे पहात असताना त्यांच्या नजरेनं टिपलं ते या अंध,अपंग,बहुविकलांग आणि भिन्नमती मुलांचं केविलवाणं जिणं. ओझं झाल्यानं आईवडिलांनी टाकून दिलेली आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानं सरकारी सुधारगृहांनीदेखील नाकारलेली अशी मुलं जाणार तरी कुठे? हा विचार शंकर पापळकरांना सतावत असे. काही मुलांच्या किडन्या काढून त्यांना मरणाच्या दारात ढकललं जातं. मुलींची गर्भाशयं काढून त्यांना रेडलाईट वस्त्यांकडे वळवलं जातं,हे भयावह चित्र ते पाहत होते. 

याच अस्वस्थतेतून त्यांनी एक भिन्नमती मूकबधिर मुलामुलींचं बालगृह सुरू केलं. पुढे या आपल्या संस्थेचं 'अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृह' असं नामकरण केलं. हे भारतातलं पहिलंवहिलं आणि एकमेव बेसहारा विकलांग पुनर्वसन केंद्र आहे. आज शंकरबाबा पंच्याऐंशीच्या उंबरठ्यावर आहेत. पण पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे अव्याहतपणे त्यांचं फिरणं सुरूच आहे. कल्पकता, मेहनत,माणुसकीचा सुगंध आणि स्वभावातला स्नेहार्द्र गहिवर यांचं एक विलक्षण मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या बालगृहात 18 वर्षावरील तरुण-तरुणीही आहेत. अशा मुलांना शंकरबाबा  घर देऊन,त्यांची लग्ने लावून तसेच त्यांना नोकरीधंदा देऊन आयुष्यात उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कितीतरी मुलामुलींना त्यांनी आपलं नाव दिलं आहे. लहानपणी खडे,माती खाणाऱ्या मुलांना शंकरबाबांनी जवळ केलं आणि त्यांच्या तोंडात अन्नाचा घास घातला. माता-पित्याचा ओलावा दिला. अशा बापमाणसाला डी.लिट.पदवी देऊन संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment