Monday 10 May 2021

सारा छिपाचा विक्रम


आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाठांतर ही संकल्पना मागे पडत चालली आहे. शाळांमध्ये पाढे पाठांतर किंवा कविता वगैरे शिक्षक  विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेत असत. इंग्रजी शब्द, गणिताची सूत्रे पाठ झाली नाहीत तर शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत. शिक्षेच्या भीतीने विद्यार्थी पाठांतरवर जोर देत असत. मात्र याच पाठांतरामुळे लहानपणी पाठ केलेली कविता किंवा पाढे नंतरच्या काळात कायम स्मरणात राहतात. समाजात व्यावहारिक रुपात वावरताना या पाठांतराचा चांगला उपयोग होतो. परंतु परीक्षा पद्धती, नापास न करण्याचे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याचे धोरण यामुळे विद्यार्थ्यांचे पाठांतर पूर्णच कमी झाले आहे. तरीही पाठांतराला पर्याय नाही,हेच खरे! आज यशाचे आयाम बदलले आहेत. टीव्हीवरचे रिऍलिटी शो, कौन बनेगा करोडपतीसारखे स्पर्धात्मक कार्यक्रम लोकांना यश,पैसा आणि कीर्ती मिळवून देत आहेत. अभिनयाबरोबरच पाठांतर उत्तम असेल तर सोन्याहून पिवळे. त्यामुळे अनेकांचा ओढा अशा कार्यक्रमांकडे वाढला आहे. अशाच एका स्पर्धात्मक कार्यक्रमात  जगभरातील तब्बल १९६ देश, त्यांच्या  राजधान्या आणि त्या देशांमध्ये वापरले जाणारे  चलन याची माहिती अवघ्या १५ मिनिटांमध्ये  सांगून एका दहा वर्षीय मुलीने अनोखा  विक्रम रचला आहे. सारा छिपा असे तिचे नाव आहे. दुबईमध्ये ऑनलाईन पद्धतीने  झालेल्या कार्यक्रमात सारा छिपाने हा विश्वविक्रम  केला आहे. यू-ट्यूब, फेसबुक आणि लिंक्डईनवर  हा कार्यक्रम लाइव्ह करण्यात आला होता. हा  कार्यक्रम झाला तेव्हा ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डस  या संघटनेचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. आणि लवकरच साराच्या विक्रमाची त्यात नोंद होणार आहे.  साराच्या या कामगिरीनंतर राजस्थानमधील  भिलवाडा या तिच्या मूळ गावी जल्लोष करण्यात  आला. एक वर्षाची असल्यापासून सारा  आईवडिलांसोबत दुबईला वास्तव्यास आहे. तीन महिन्यांचा सराव देश, त्यांच्या राजधान्या आणि त्या देशांमध्ये वापरले जाणारे चलन अशी ५८५ नावे तोंडपाठ करण्यासाठी साराला तिचे प्रशिक्षक सुशांत मैसोरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साराने तीन महिने सराव केला. सुरुवातीला तिला ही नावे सांगण्यासाठी दीड ते दोन तास लागायचे. मात्र सरावानंतर हा वेळ अवघ्या १५ मिनिटांवर आला. सारावर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळेच मुलांनी पाठांतराकडे दुर्लक्ष करून नये. शाळांमधील अभ्यासाबरोबरच अन्य छंद जोपासत पाठांतराला चालना द्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment