Sunday 16 May 2021

जगातील अनोखे रेस्टॉरंट

 मुलांनो,तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेला असाल. तिथे तुम्ही तुमच्या मनपसंद मेनूचा आस्वाद घेतला असाल. पण या जगात असे काही रेस्टॉरंट आहेत की, तिथे तुम्हाला मेनूपेक्षाही तिथली बैठकव्यवस्था,डेकोरेट आवडल्याशिवाय राहणार नाही. बर्फापासून बनलेलं रेस्टॉरंट, पक्ष्यांच्या आकाराचं रेस्टॉरंट,धबधब्याजवळच रेस्टॉरंट आणि आकाशात गरम हवेच्या फुग्यावर चालणारं रेस्टॉरंट यांच्याविषयी कधी कुठं वाचलं आहे का? नाही ना, मग चला त्यांच्याविषयी जाणून घेऊ या.


आईस रेस्टॉरंट,संयुक्त अरब अमिरात: या देशाची राजधानी असलेल्या दुबईत आईस म्हणजेच संपूर्ण बर्फात बनवण्यात आलेले रेस्टॉरंट आहे. याच नावच आईस रेस्टॉरंट आहे. बर्फातलं हे जगातील एकमेव रेस्टॉरंट आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथली प्रत्येक वस्तू जसं की खुर्ची, टेबल, सजावटीचे साहित्य बर्फापासून बनले आहे. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर अंटार्क्टिकासारख्या  प्रदेशातील थंडीची जाणीव होते. रेस्टॉरंटमधील तापमान नेहमी शून्य अंशाच्या खाली असते. त्यामुळे थंडीपासून स्वतः बचाव करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खास प्रकारचे जॅकेट घालावे लागते.


बर्ड्स नेस्ट रेस्टॉरंट,थायलंड: झाडावर असलेल्या पक्ष्यांचं घरटं सगळ्यांनी पाहिलं असेलच. त्यापासून प्रेरणा घेऊन थायलंडमध्ये घरट्याच्या आकाराचं रेस्टॉरंट उभारण्यात आलं आहे. हे रेस्टॉरंट जमिनीवर नाही तर झाडावरच घरट्यासारखं बांधण्यात आलं आहे.रेस्टॉरंटला वायरीच्या (केबल)साहाय्याने सोळा फूट वरती झाडावर  मजबूतपणे लटकवण्यात आले आहे.रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी केबलचाच आधार घ्यावा लागतो. यात एकावेळेला चार व्यक्ती बसू शकतात. ग्राहकाला जेवण पुरवण्यासाठी वेटर केबल तारेचा उपयोग करतो. हे रेस्टॉरंट समुद्र किनारी आहे. ग्राहक भोजनाचा आस्वाद घेताना आजूबाजूचा सुंदर नजराणा पाहू शकतो.


लबस्सिन वाटरफॉल रेस्टॉरंट,फिलिपिन्स: हे  रेस्टॉरंट एका धबधब्याजवळ उभारण्यात आले आहे. धबधब्यातून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याचा आनंद लुटत जेवणाचा आस्वाद घेता येतो. माडाच्या बनात वसवण्यात आलेले हे जगातील एकमेव अनोखे रेस्टॉरंट आहे. इथला धबधबा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे,पण तुम्हाला हा धबधबा मानवनिर्मित आहे, असं अजिबात भासत नाही. पाण्यात उतरण्यासाठी ग्राहकाला चपला बाहेर सोडाव्या लागतात.


हॉट एअर बलून रेस्टॉरंट, नेदरलँड: तुम्ही टीव्हीवर हॉट एअर बलून म्हणजेच गरम हवेचा फुगा पाहिला असेलच. कधी कुणी यातून सैरसपाटाही मारला असेल.  नेदरलँडमध्ये असेच एक रेस्टॉरंट आहे,जे हॉट एअर बलूनमध्ये चालवले जाते. या बलूनच्या टोपलीत बसून आकाशात काही हजार फुटांवर भोजनाचा आस्वाद घेता येतो. हे रेस्टॉरंट एंजेलिक श्मीइनक नावाची एक शेफ महिला चालवते. ती बलूनमध्येच जेवण बनवते व ग्राहकाला पुरवते.गरम हवेच्या फुग्याच्या टोपलीत भोजन बनवण्याची आयडिया तिचीच आहे. ग्राहक बलूनच्या टोपलीत उभा राहून आकाशातील सुंदर नजारा पाहत भोजन करू शकतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment