Wednesday 12 May 2021

न उडणारा काकापो पोपट


 पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी या भूतलावर आहेत. पेंग्विन,इमूसारखे न उडणारे पक्षी माहीत असतील,पण न्यूझीलंडमध्येही एक काकापो नावाचा एक पक्षी आहे,ज्याला उडता येत नाही. काकापो हा पोपट वर्गातील पक्षी असून असून तो दिसायला घुबडासारखा दिसतो. जगातला सर्वात मोठा पोपट म्हणून यांची नोंद आहे. पिवळसर हिरवा पिसाऱ्यात हा पक्षी तसा गुबगुबीत दिसतो. याला राखाडी रंगाची चोच असते.पाय लहान असतात.त्याच्या शरीराच्या मानाने पंखदेखील लहान असतात.शेपटीही बारीक असते. काकापो पोपट निशाचर आहे. दिवसा लपून राहतो आणि रात्री भक्ष्य शोधायला बाहेर पडतो. याचे वजन दोन ते चार किलो असते तर आयुष्यमान 40 ते 80 वर्षांपर्यंत असते. ही लुप्त होत चाललेली प्रजाती असून याच्या संवर्धनासाठी न्यूझीलंड सरकारने कंबर कसली आहे. याला सरकारने दोन वेळा 'बर्ड ऑफ द इयर'चा सन्मान दिला आहे.1990 मध्ये यांची संख्या फक्त 50 होती,आता ती वाढून दोनशेच्यावर पोहचली आहे. 

काकापो पक्ष्याला 'मॉस चिकन' असेही म्हटले जाते.ही प्रजाती संपूर्ण एटोरियामध्ये आढळून येत होती,परंतु आता जिथे त्याची शिकार होत नाही, अशा मोजक्याच  बेटांवर आढळून येत आहे. हा पक्षी नेहमी सावध असतो.हा अगदी सावकाश चालतो, मात्र धावताना उड्या मारत धावतो. जमिनीवर घरटे करून राहणारा काकापो स्वतःच्या बचावासाठी झाडाझुडुपांचा आधार घेतो.


No comments:

Post a Comment