Tuesday 10 March 2020

ससा या प्राण्याविषयी माहिती

ससा हा गोंडस प्राणी आहे. अनेकांचे लक्ष सशाकडे सहज वेधले जाते. सशाची आकृती चंद्रावर दिसते, असे वर्णन नेहमीच मानव करत आला आहे. अर्थात ते चंद्रावरचे डाग आहेत. सशांची वस्ती जगभर आढळते. खरे म्हणजे त्यांचे दोन प्रकार आढळतात. जाती अनेक आहेत; पण बिळात राहणारे, कळपात वावरणारे हा एक प्रकार, तर उघड्यावर वावरून झुडपाच्या वा जमिनीतील खळग्यांच्या आश्रयाने राहणारे, पण एकेकटे वावरणारे हा दुसरा प्रकार. बिळातल्या प्रकाराला 'रॅबिट' म्हणतात, तर उघड्यावर एकटाच आढळणारा 'हेअर' या नावाने ओळखला जातो.

 ससा अत्यंत चपळ प्राणी आहे. पण उघड्यावर सापडला तर कुत्रा, कोल्हा वा माणसाची बंदूक त्याला झटकन टिपते. क्वचित घार, ससाणा, गरुड यांचेही तो भक्ष्य बनतो. या सर्वांनाच सशाचे मांस आवडते. कदाचित या सर्वांना पुरून उरण्यासाठी म्हणूनच सशाचा पुनरुत्पादनाचा वेग अफाट आहे. सशांची एक जोडी वर्षभरात त्यांची संख्या बारा पंधरावर नेऊ शकते. वर्षभरात तीन ते चार विणी होऊन दरवेळी तीन चार पिल्ले जन्माला येऊ शकतात. ससे पाळणाऱ्यांनी एक जोडी आणली तर पाच वर्षांत त्याला या सशाचे करू काय असा प्रश्न पडण्याइतकी प्राण्यांची गर्दी सहज निर्माण होऊ शकते.
 एक बरे आहे की सशांना खायला कोणताही हिरवा पाला चालतो. गवत, भाज्या, कंदमुळे, तृणमुळे, बिया यांपैकी जे मिळेल ते खाऊन ससे वाढतात. हिरवा पाला नसेल, तेव्हा ससा धान्य वा धान्यासारख्या बिया खाऊन दिवस काढतो. कडाक्याच्या थंडीत ध्रुवीय भागात ससे काही महिने सुप्तावस्थेतही काढतात. पण अशा जाती कमीच आहेत.
 सशाचे आयुष्य पाच ते पंधरा वर्षे असते. अनेक शत्रू व साथीचे रोग यांना ही जात सहज बळी पडते. सशाचे डोळे लालसर, तपकिरी, काळे, करडे असे वेगवेगळे असतात; तर रंग ऋतूप्रमाणे करडा वा पांढरा होतो. वजन त्यामानाने खूपच कमी म्हणजे जेमतेम पाचएक किलो व एवढेच असते. गुबगुबीत ससा सहज दहा किलो वजनाचा भरेल, असे वाटते; पण तो अंदाज चुकतो. 'हेअर' या प्रकारातील सशांचे कान चक्क त्याच्या लांबीएवढेच लांब असतात. तर रॅबिटचे कान त्यामानाने लहान आणि पायही आखूड असतात. दुडक्या उड्या मारतच ससे झेपावतात. मागचे पाय अत्यंत सशक्त असल्याने लांबवर उडी मारणे त्यांना शक्य होते.
 सशांची एक गम्मत नेहमीच पहावयाला मिळते. कुत्रा, कोल्हा यांचा वास लागल्यास किंवा चाहूल लागल्यास ससा मेल्यागत, हालचाल न करता पडून राहतो. अगदी जवळ येऊन हा प्राणी झडप घालणार, त्या क्षणी ससा टुणकन उडी मारून लांब पळतो. स्वतःचा वेग या प्राण्यापुढे कमी पडणार, याची जाणीव असल्यानेच वेड्यावाकड्या उड्या मारत हुलकावण्या देत पळत बघता बघता एखादे झुडुप वा बीळ ससा गाठतो. या दरम्यान हवेतून झेपावताना हा प्राणी पाठलाग करणाऱ्या प्राण्यावर नजरही ठेवून असतो. स्वतःचा जीव वाचवणे, स्वतःची ताकद व वेग आजमावणे व त्याच दरम्यान विनासायास पाठलाग करणाऱ्याला दमवणे या गोष्टींचा मेळ ससा मोठ्या हुशारीने घालतो.
 बिळात राहणाऱ्या सशांची जात जेव्हा पाळली जाते, तेव्हा त्यांना कृत्रिम बिळे वा पिंजर्‍याचा अंधारा भाग मुद्दाम निर्माण करून द्यावा लागतो. नाहीतर त्यांच्या एकंदरीतच निरोगीपणावर, पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम घडतो.
(सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment