Tuesday 3 March 2020

सापांविषयी माहिती

जगभरात सापांच्या ३००० जाती आहेत. भारतात त्यापैकी सुमारे २०५ जाती आढळतात. त्यातली ५२ जाती विषारी आहेत. या ५२ पैकी ही जवळ जवळ ४० जाती समुद्रात राहाणाऱ्या आहेत. विषाच्या संदर्भात सापांचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. बिनविषारी, निमविषारी, आणि विषारी. बिनविषारी सापांना विषग्रंथी नसतात. त्या मुळे ते चावले तरी माणसांना अपाय होत नाही. नानेटी, दिवड, धामण हे साप बिनविषारी आहेत. निमविषारी व विषारी या दोन्ही प्रकारचे साप प्रत्यक्षात विषारीच असतात. पण निमविषारी सापांच्या विषापासून माणसाच्या जिवाला सहसा धोका संभवत नाही. निमविषारी साप त्यांचे विष भक्ष्याला बेशुद्ध करायला किंवा पचवायला वापरतात. मांज-या, हरणटोळ हे निमविषारी साप आहेत. नाग, मण्यार, फुरसे, घोणस हे महाराष्ट्रातील प्रमुख विषारी साप आहेत.
विषारी सापही त्यांच्या विषाचा वापर
निमविषारी सापांप्रमाणेच करतात परंतु त्यांचे विष
माणसासाठी प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे सर्पदंश
झाल्यास लगेच वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे.
सापाच्या प्रतिविषाची भारतात निर्मीती प्रथम मुंबईतील
हॉपकिन्स इंस्टीट्यूटने केली. प्रतिविष तयार करण्यासाठी सर्वप्रथम सापाचे विष काढतात. हे विष नंतर अल्प मात्रेत घोड्याला दिले जाते. घोड्याची या विषाला प्रतिकार करण्याची शक्ती तयार झाली की अशा घोड्याचे रक्त हे प्रतिविष बनवायला वापरले जाते.
साप दमट अंधाऱ्या ओलसर जागी राहणे पसंत करतात. त्यामुळे घराला लागून किंवा घरात पालापाचोळा, दगड-विटा, लाकडे, सरपण यांचा ढीग साठवू नये. कारण यामुळे सापाला लपण्यासाठी उत्तम जागा मिळते. रस्त्यात कुठे साप दिसला तर त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. साप हालचालींचा अंदाज घेत असल्याने शक्यतो शांत उभे रहावे.
म्हणजे सापच तुमच्यापासून दूर निघून जाईल. साप या प्राण्याबद्दल अगदी लहानपणापासून सतत काही ना काहीतरी ऐकलेले असतेच. सापांचे प्रकार, आपल्या देशातील आढळ, सापांबद्दलच्या दंतकथा, विषाचे प्रमाण व टक्केवारी हे अनेकांच्या अगदी तोंडावरही असते. त्यामुळे या सर्वांच्या बारीकसारीक माहितीत जास्त खोल न शिरता सापाची काही वैशिष्ट्ये ज्ञात करून घेऊया.
साप हा पृष्ठवंशी, थंड रक्ताचा, सरपटणारा प्राणी आहे. साप झपाट्याने पळतो, बघता बघता दिसेनासा होतो; त्याचा वेग किती असावा ? सरसकट साप सहज ताशी बारा किलोमीटर वेगाने अंतर कापू शकतो. आफ्रिकेतील मांबा नावाचा साप सर्वात कमी वेगवान समजला जातो. त्याचा वेग थोड्या अंतरात चक्क वीस किलोमीटर ताशी एवढा असतो म्हणजे जोरात पळणाऱ्या माणसाला गाठू शकेल, इतका ! किंगकोब्रा बद्दल खूप ऐकले जाते; पण त्यापेक्षा मांबाचे विष जास्त जहाल असते. किंग कोब्राचे विष टोचण्याची त्याची ताकद व त्याचे एकूण आकारमान व विषाचा आकार (quantity) यांमुळे किंग कोब्रा कोणत्याही प्राण्याचा बळी सहज घेतो. पण समान प्रकारच्या तुलनेत मांबाच सरस ठरतो. क्रेट जातही याच्या आसपास येते.
किंग कोब्रा चार पाच मीटरपर्यंत लांब असतो. एक मीटरचा फणा उंचावून लांबवर सहज झेप घेऊ शकतो. स्वाभाविकच मनात कल्पना येते, हाच सर्वात लांब सर्प / नाग असावा; पण तसे नाही. अॅनाकोंडा जातीचा साप चक्क दहा मीटरपर्यंत लांब असतो. अनेक समुद्रसाप कोब्रापेक्षाही मोठे असतात.
 अजगर शिकार गिळून टाकतो, पण त्या वेळी जनावर मेलेले असते. अजगर प्रथम विळखे घालतो. अजगराची चपळाई विळखे घालण्यात असते. गिळणे हा प्रकार सर्वच साप करतात. पण विळखे घालून मारणारा मात्र फक्त अजगरच. प्राण्याला विळखे घालून त्याची श्वसनक्रिया बंद पाडणे हे अजगराच्या विळख्याचे वैशिष्ट्य. अजगराच्या विळख्यातून सुटलेल्या काहींनी व त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी नोंदलेल्या बाबी म्हणजे श्वसन केले की, अजगराचा विळखा घट्ट होतो. म्हणजे श्वसनाची हालचाल अजगराच्या शरीरावर नोंदली जाऊन स्नायू घट्ट होतात. टप्प्याटप्प्याने हे विळखे अशा अवस्थेत येतात की, श्वसन बंद पडते. प्राणी मृत झाल्याची खात्री झाल्यावर मग सावकाश गिळणे सुरू होते.
एवढासा साप वा अजगर मोठाला प्राणी कसा गिळतो ? तो गिळत नाही, तर प्रथम जबडा सुटा करतो. खालचा व वरचा जबडा जोडणारा सांधा सोडवायची सोय या प्राण्यात आहे. मग तो फक्त पुढे सरकत जातो म्हणजे प्राण्याला मध्ये ठेवून शरीर पुढे सरपटत नेण्याची क्रिया घडते. अन्यथा गिळणे या अर्थाने ही क्रिया घडणे अशक्यच असते.
 अधिक गुळगुळीत निसरड्या पृष्ठभागावरून सापाला सरपटणे फार कठीण जाते, कारण नागमोडी हलचाली करत तो पुढे जात असतो. ही हालचाल करणेच तेथे त्याला जमत नाही. याउलट झेपावणारा साप हा प्रकार आफ्रिकेत सापडतो. झाडाच्या उंच फांदीवरुन सरळ झेपावत तीस ते चाळीस फूट हवेत हालचाली करत वेग मंदावुन नेमक्या खालच्या कमी उंचीवरच्या झाडावर हे साप उतरतात. नेमकेपणाने हवेतील कोलांट्या व वळणे यांनी खाली येण्याची गती मंदावू शकते. सर्व जातींना ही कला ज्ञात नाही.  सापाचा वावर झाडांवर, पाण्यात किंवा बिळात असतो. गुळगुळीत भिंतीवर वा खंदकातून मात्र त्याला वर येणे जमत नाही. मानव सापापासून संरक्षणासाठी याच गोष्टींचा उपयोग करून घेतो. जोते गुळगुळीत ठेवणे वा खंदक खणणे हे जंगलात वापरले जाणारे नेहमीचेच उपाय.
अनेक आदिवासी सापाचे डोके सोडले, तर अन्य भाग खायला वापरतात. साप व नाग तर लहान सापांना खाऊनच जगतात. सापाचे संपूर्ण शरीर स्नायूंनी बनलेले असल्याने त्यामध्ये पौष्टिक द्रव्ये म्हणजे प्रथिनांचे प्रमाण खूपच असते. सापाचे विष म्हणजेही एक प्रकारचे प्रथिनच असते. त्याचा वापर अन्नपचनासाठी, संरक्षणासाठी व भक्ष्य मारण्यासाठी केला जातो.  साप उंदीर मारतो म्हणून तो उपयुक्त समजला जातो. विषारी सापांचे प्रमाण पाचांत एक एवढेच असते. मण्यार, घोणस, नाग, फुरसे, विरोळा इत्यादी अनेक सापांचे प्रकार भारतात आढळतात. नागपंचमीला नागाची पूजा करण्याची पद्धत पडण्याचे कारण शेतीची कामे त्याच वेळी सुरू होतात. त्यामुळे नाग व शेतकरी यांत परस्परसामंजस्य राहावे, हीच त्यामागची इच्छा असावी.
('सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment