Monday 2 March 2020

समुद्रपाण्याचा औद्योगिक वापर व लाटांपासून ऊर्जा

समुद्रातून काय मिळते, या प्रश्नाचे खरे उत्तर द्यायचे झाले तर 'काय मिळत नाही ?' असेच द्यावे लागेल. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवता येते व मासेमारी करून मासे मिळवता येतात, याच गोष्टी फक्त आपल्या डोळ्यासमोर येतात. या दोन गोष्टी अन्नपदार्थ म्हणून तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मिठाशिवाय सारे अन्नच आर्णी बनते, तर मासे हेच अनेकांचे प्रमुख अन्न आहे. तसेच लाटांपासून ऊर्जा सुद्धा मिळवता येते.

पण सध्याच्या औद्योगिक युगात यापुढे जाऊन समुद्राच्या पाण्यापासून काही महत्त्वाच्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. मिठाच्या द्रावणातून विजेचा प्रभाव सोडला तर तीन उपयुक्त गोष्टींची आपोआप निर्मिती होते : क्लोरीन हा वायू, हायड्रोजन हा वायू व सोडियम हायड्रॉक्साइड ही अल्कधर्मी पावडर. त्यांची निर्मिती झाल्यावर पुढच्या टप्प्यात हायड्रोजन व क्लोरीनच्या संयोगातून हायड्रोक्लोरिक अॅसिड या अतिशय आवश्यक औद्योगिक आम्लाची निर्मिती होते. क्लोरीन व सोडियम हायड्रॉक्साइडचा संयोग करून सोडियम हायपोक्लोराइटचीही निर्मिती करता येते.
आयते समुद्राचे पाणी, समुद्रलाटांपासून मिळवलेली वीज व दोन्हींचा वापर करून मुद्दाम बांधलेल्या टाक्यांत या पाच रासायनिक गोष्टींची जगभर टनावर निर्मिती केली जाते. क्लोरीनचा वापर जवळपास प्रत्येक रासायनिक कारखान्यात तर लागतोच; पण याशिवाय सर्व कापड उद्योगाला ब्लीचिंगसाठी क्लोरीनची खूपच गरज भासते. न्यूक्लिअर फ्यूजन साध्य झाल्यावर भविष्यकाळात समुद्रातील पाण्यातून हेवी वॉटर काढून त्यातील ड्युटेरियमपासून फ्यूजन तंत्रावर हिलियम तयार करून ऊर्जानिर्मिती करता येईल.
याशिवाय अलीकडेच अरब देशातून, पश्चिम आशियात शुद्ध पाणी तयार करण्यासाठी समुद्रपाण्याचा वापर केला जातो. त्याला खूपच खर्च येतो. पण पाण्याची प्रचंड कमतरता व पैशाची उदंडता यांमुळे त्यांना हे शक्य झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी समुद्रपाणी शुद्ध करून, ऊर्ध्वपातन करून सोडवला आहे. खारट पाणी उपयोगात आणता येते, ते असे!
पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्राला उधाण येते. एरवी शांत स्थितप्रज्ञासारखा असलेला समुद्र यावेळी अतिशय भीषण वाटतो. पाच ते सात मीटर उंचीच्या पाण्याच्या लाटा बेभानपणे किनाऱ्यावर आदळतात. किती प्रचंड ताकद असते त्या लाटांत ? झाडे, इमारती, खडक यापैकी मध्ये येणारे काहीही गिळंकृत करू शकणारी ही ताकद जर ऊर्जानिर्मितीला वापरता आली तर ?
या प्रश्नावर अनेक वर्षे काम चालू आहे. सध्या दोन प्रकारे समुद्रालाटांपासून ऊर्जा मिळवली जाते. समुद्रावर काही वेगळ्या प्रकारचे तराफे तरंगत ठेवलेले असतात. स्टीफन साॅल्टर या शास्त्रज्ञांनी हे तराफे तयार केले म्हणून त्यांना सॉल्टरडक असे म्हणतात. लाटांच्या जोरामध्ये तराफा लाटेवर उचलला जातो. लाट ओसरली की वजनामुळे तो खाली जातो. या क्रियेमध्ये पाण्याच्या दाबावर तराफामध्ये बसवलेली जनित्रे फिरतात व वीज निर्माण केली जाते.
 दुसऱ्या प्रकारात भरती ओहोटीच्या पाण्याच्या दोन पातळ्यांतील फरकाचा उपयोग केला जातो. खाडीच्या तोंडाशी छोटे धरण बांधून भरतीच्या वेळी पाणी आत येताना जनित्रे फिरतात, तर ओहोटीच्या वेळी आत घेतलेले पाणी परत सोडतानाही त्याच्या जोरावर जनित्र फिरतात. या प्रकारची वीजनिर्मिती केंद्रे उत्तर फ्रान्समध्ये, कॅनडात व मूरमान्स्कच्या किनाऱ्यावर रशियात गेली काही वर्षे काम करत आहेत.
 जरी तेथील वीजनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर नसली, तरीही कसलीही देखभाल वा पुनरावर्ती खर्च त्यात नसल्याने ती अत्यंत स्वस्त पडते व एकदा केलेला भांडवली खर्च अनेक वर्षे उपयोगी पडत राहतो, हे महत्त्वाचे.
('सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment