Tuesday 24 March 2020

ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार

कुलदीप पवार हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मदार्नी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अर्शूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील यांच्या भूमिका विशेष गाजल्या. परमवीर या दूरदर्शनावरील मालिकेमुळे यांना भरपूर लोकप्रियता लाभली. कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले.
मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची प्रभाकर पणशीकरांशी ओळख झाली. त्या सुमारास इथे ओशाळला मृत्यू या नाटकातल्या 'संभाजी'च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली. त्यानंतर त्यांना कृष्णा पाटील दिग्दर्शित 'एक माती अनेक नाती' या चित्रपटात नायकाचे काम मिळाले आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरवात झाली. अरे संसार संसार, शापित, मदार्नी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, सर्जा, वजीर, जावयाची जात अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अर्शूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, पाखरू अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २0१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी मूत्रपिंडांच्या आजाराने निधन झाले. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

No comments:

Post a Comment