Monday 2 March 2020

महिला कमांडर अँनी दिव्या

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अँनी दिव्या कधीच विमानात बसलेली नाही, पण आज ती जगातील सर्वात मोठय़ा प्रवासी विमानांपैकी असलेले बोईंग ७७७ हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे. ३0 वर्षीय अँनी जगातील सर्वात कमी वयाची एकमेव महिला कमांडर आहे. बोईंग ७७७ विमान इतके मोठे असते की यामध्ये ३५0-४00 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. पंजाबमधील पठाणकोट येथे जन्मलेल्या अँनीचे वडील सैन्यात एक सैनिक होते. ती जेव्हा १0 वर्षांची होती तेव्हा वडिलांचे पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे झाले. पायलट बनण्याचे स्वप्न अँनी लहानपणापासून पाहत होती, पण तिचे इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नव्हते. वडिलांची आर्थिक परिस्थिती ऐवढी चांगली नव्हती की ते तिच्या पायलट अभ्यासासाठी १५ लाख देऊ शकत नव्हते.
दरम्यान तिच्या वडिलांनी आपल्या मित्रांकडून काही पैसे उद्धार घेतले आणि बाकीचे पैसे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. अँनी सांगते की माझ्या आईबाबांनी माझ्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवला. जे मी आज आहे, मी त्याबद्दल त्यांची आभारी आहे. फीची व्यवस्था केल्यानंतर अँनीला उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतील फ्लाइंग स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिच्या समोरील आव्हान एवढय़ातच संपले नव्हते.पायलटला वेगवेगळ्या देशांत जावे लागते आणि वेगवेगळ्या लोकांना भेटावे लागते म्हणूनच या क्षेत्रात इंग्रजीला फार महत्त्व आहे. अँनीची इंग्रजी फार चांगली नव्हती, त्यामुळे तिची इंग्रजी सुधारण्यासाठी तिला तिच्या वर्गसोबत्यांसह आणि इतरांसोबत तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणते की, सर्व प्रथम लोक माझ्यावर हसत होते, माझी टिंगलटवाळी करत होते. पण काही काळानंतर ते लोक माझ्या चुका सुधारू लागले. त्याचवेळी मी इंग्रजी बातम्या आणि चित्रपट पाहणे सुरू केले आणि संगीत ऐकणे सुरू केले. आज माझे इंग्रजी माझ्या हिंदीपेक्षा चांगले आहे. अँनी वयाच्या १७ व्या वर्षीच पायलट झाली होती. ती म्हणते, जेव्हा प्रशिक्षणादरम्यान मी पहिल्यांदाच विमान उडवले, तेव्हा असे वाटत होते की माझे स्वप्न सत्यात आले आहे. वयाच्या १९व्या वर्षी तिला एअर इंडियात नोकरी मिळाली. त्यावेळी बोईंग ७३७ विमान उडवले आणि वयाच्या २१व्या वर्षी तिने बोईंग ७७७ विमान उडवणे सुरू केले. अलिकडे, ती हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे.

No comments:

Post a Comment