Wednesday 4 March 2020

पोलीस सहआयुक्त डॉ. शिसवे यांच्या युवकांना काही टिप्स

*पहिल्याच वेळी आपल्याला यश मिळालं की डोक्यात हवा जाण्याची शक्यता अधिक असते. अपयशातून यशाचा मार्ग सापडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने यशाची किंमत कळते. मात्र त्यावेळी आपल्यासमोर असलेला आदर्शवाद,मूल्यांची कास आयुष्यभर कधीच सोडू नका. कुठल्याही क्षेत्रात करिअर करा,मात्र 'न मुंह छुपा के जियो और न सर झुका के जियो'.
* स्वतःची संवेदनशीलता कधीही कमी होऊ देऊ नका. त्याची स्वतःच वारंवार उजळणी करा.
*आपण पहिल्यांदा गाव सोडतो तेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यांत आलेले अश्रू प्रत्येक वळणावर आठवा.
*प्रलोभने जरूर येतात, पण स्वतःचा आतला आवाज सतत जिवंत ठेवा.
*संकट काळात धावून येणाऱ्या मित्रांना कधीच विसरू नका.
*अपयश पचवल्याने पुढे यशस्वी झाल्यानंतरही पाय जमिनीवरच ठेवण्याची ताकद मिळते.
*आई आपण बाहेर पडताना हातावर दही ठेवते. त्या दह्यात यशाचे सामर्थ्य नसले तरी ते ओंजळीत घेतल्यानंतर मनात निर्माण होणाऱ्या आईच्या अपेक्षां विषयीच्या भावना सतत प्रेरणा देत राहतात.
*एक लहानशी मेणबत्ती पेटत असली तरी ती एका विशिष्ट लयीत डोलत असते. "जगातला सारा अंधार मी संपवू शकत नाही,पण जगातला सारा अंधार जरी एकत्र आला तरी तो माझा प्रकाश मिटवू शकत नाही." असा संदेश ती देत असते. हाच सकारात्मक विचार मनात सतत जागता ठेवा.
डॉ. शिसवे यांचा अल्पपरीचय
 मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 53 व्या आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. माझा प्रवास हा खेड्यातून सुरू झाला. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळलो आणि अपयश पचवत यशाला गवसणी घातली.
आई गावची पहिली महिला सरपंच होती. माझे एकच वर्ग असलेल्या शाळेत माझं शिक्षण झालं. पण तरीही आईने शालेय शिक्षण सुरू असतानाच विविध स्पर्धा परीक्षांना बसण्याचा आग्रह धरला. दहावीच्या परिक्षेनंतर मात्र आपण पोलीस अधिकारी व्हावं वाटू लागलं. पुढे बारावीनंतर परंपरेप्रमाणे वैद्यकीय शाखेला प्रवेश घेतला. पहिल्यांदाच गाव सोडून बेळगावला आलो.डॉक्टर झालो आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कामही सुरू केले.या दरम्यान काही अपमानही पचवले. मात्र भावाच्या आकस्मिक अपघाती निधनाने पुन्हा स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा संकल्प केला आणि झपाटून कामाला लागलो.पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहचलो, मात्र यश आले नाही. मोठा धक्का बसला. पुन्हा नव्याने उभा राहिलो आणि यश खेचून आणले.
अभ्यासात आणि आजवरच्या साऱ्याच परीक्षांमध्ये टॉपर राहिलो. मात्र कधीच 'बुकिश'असा शिक्का लावून घेतला नाही.'खेलो, कुदो, पढो' असेच संस्कार पालकांनी दिले आणि तोच संस्कार शेवटपर्यंत जपला. पोलीस अधिकारी म्हणून गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली, मुंबई आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणाचे अनुभव वेगळे होते.गडचिरोली, गोंदिया मध्ये काम करताना नेतृत्व गुण अधिक विकसित झाले. गडचिरोली त काम करणं म्हणजे रोज जिवावर उदार होऊन च काम करावे लागे. येथे काम करताना मी नेतृत्व करत होतो. त्यामुळे नक्षलवादयांशी लढताना स्वतः सह सहकाऱयांचीही जबाबदारी माझ्यावर होती. कधी कुठे भूसुरुंग फुटेल, बॉम्बस्फोट होईल हे सांगता येत नाही. चारही बाजूंनी गोळीबार सुरु असताना नक्षलवाद्यांशी सामना करण्याचे अनेक थरारक प्रसंग या काळात आले.  सिंधुदुर्ग मध्ये माणसांचे प्रेमच इतके मिळाले की, पाच पैशाचा भ्रष्टाचार करावयाचा नाही, हा आत्मविश्वास आणखी दुणावला. मुंबईत झोन क्रमांक 1मधील कामाचा अनुभव बरेच काही देऊन गेला.

No comments:

Post a Comment