Sunday 29 March 2020

किरणोत्सर्ग म्हणजे काय ?

फुकुशिमा येथील अणुभट्टय़ांमधील दुर्घटनेनंतर ज्या काही संज्ञा तुमच्या आमच्या चर्चेत येऊ लागल्या आहेत, त्यातलीच एक आहे किरणोत्सर्ग. निसर्गात १ अणुभाराच्या हायड्रोजनपासून ते ९२ अणुभाराच्या युरेनियम पर्यंत एकूण ९२ मुलद्रव्य आहेत. प्रत्येक मुलद्रव्याची थोडाफार वेगवेगळा अनुभव असलेली रूप म्हणजेच त्यांचे आयसोटोप्सही अस्तित्वात आहेत. यापैकी काहींच्या अणुगर्भातून नैसर्गिकरित्याच काही ऊर्जाधारी किरण उत्सर्जित होत असतात. या नैसर्गिक आविष्काराला किरणोत्सर्ग असं म्हणतात. एकोणीसावं शतक सरता सरता फ्रेंच वैज्ञानिक हेन्री बेकरेल याने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
त्याला असे दिसून आले की युरेनियमचे खनिज काळ्या कागदात आणि सूर्य प्रकाशापासून दूर अंधारात ठेवलेले असतानाही त्याच्या सानिध्यातल्या फोटो फिल्मवर त्याचा ठसा उमटतो. युरोनियम मधून काही अदृश्य किरण बाहेर पडल्यामुळे हा परिणाम होतो हे त्याने ओळखले. त्याचा त्याने आणि नंतर पीयेर व मारी क्युरी या दाम्पत्याने अधिक अभ्यास करून किरणोत्सर्गाची ओळख पटवून दिली. पुढे रुदरफोर्ड यांनी या किरणोत्सर्गात तीन प्रकारची शक्तिशाली प्रारणे असतात हे दाखवून दिले. त्यातील अल्फा किरणांवर धन विद्युतभार असतो ते वजनदारही असतात आणि एखाद्या कागदाच्या तुकड्यांच्या आरपारही जाऊ शकत नाहीत. बीटा किरण हे इलेक्ट्रॉनसारखे ऋण विद्युतभारधारी असतात. ते जरी खोलवर जाऊ शकत असले त तरी अंगावरचे कपडेही त्यांना अडवू शकतात. कोणताच विद्युतभार नसलेले गामा किरण मात्र तीव्र ऊर्जा धारण करणारे असतात आणि खोलखोलवर जाऊ शकतात. त्यांना अडवण्यासाठी काँक्रिटची जाड लादी किंवा शिशाचा जाड ठोकळा यांची गरज भासते. नैसर्गिक आविष्कार असल्यामुळे जगात सर्वत्र कमी मात्रेचा किरणोत्सार असतोच पण त्याचा सजीवांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण जर त्याची मात्रा विशिष्ट मर्यादेबाहेर वाढली तर मात्र त्याचे विविध अनिष्ट परिणाम होऊन तो जीवघेणाही होऊ शकतो.
अणुभट्टीत मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग होत असतो पण तो आटोक्यात राहील व त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांनाच काय पण त्या अणुऊर्जा केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. याच किरणोत्सर्गाचे अनेक विविध उपयोगही आहेत. खाद्यपदार्थांवर यांचा मारा करून त्यांचं कीटक किंवा जीवाणूंपासून संरक्षण करता येतं. खाद्यपदार्थ अधिक काळ टिकवुन ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कांद्याला कोंब फुटून त्याची नासधूस होऊ नये यासाठी त्याच्यावर गामा किरण मारा करून तो अधिक काळ टिकवता येतो. याच प्रक्रियेचा वापर करून कोकणचा आंबा अमेरिकेत निर्यात करण्यातही यश मिळालेलं आहे. गॅमा किरणांचा मारा करून कर्करोगावरही उपचार केला जातो. तसेच काही रोगांच्या निदानासाठीही किरणोत्सर्गी आयसोटोपचा वापर केला जातो.
(डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment