Monday 13 April 2020

राष्ट्र उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षाच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषनामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही. तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबलता निर्माण करण्याची कृती कार्यक्रम आहे.
जाज्वल्य, राष्ट्रानिष्ठ आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि मूलभूत सिद्धांत मांडणार्‍या प्रचंड ग्रंथरचनेत, पत्रकारितेत, लिखाणात, भाषणात, या देशाचे भौगोलिक अखंडता, राष्ट्रीय एकता आणि अस्मिता याला छेद पडेल अथवा ते भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही. स्वतंत्र्य भारत हे मजबूत, सबल आणि प्रगत राष्ट्र झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन स्वराज्य हे केवळ मूठभर लोकांचे आणि सत्ताधीशांचे आहे असे नव्हते तर पीडित आणि उपेक्षितांसह सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पना बाबासाहेबांच्या मनात सतत होती.
आम्ही सर्व एक आहोत ही भावना म्हणजेच राष्ट्र, भारतातील फार मोठा जनसमूह हा जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली जर वेगळा पडलेला असेल तर तो समूह देशाचा प्रमुख प्रवाहात कसा येईल? म्हणजेच खर्‍या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही आणि राष्ट्रीय भावना निर्माण होणार नाही. आमची विविधतेतील एकता केवळ घोषणा होईल. या वंचित जनसमूहाला बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि चळवळींनी प्रमुख प्रवाहात सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य केले. राष्ट्रवाद हे खर्‍या अर्थाने लोकांची सांस्कृतिक आणि एकात्मिकतेची भावना आहे. ती मनुष्याच्या विचारांची उपज आहे. म्हणून त्याला जीवन व कृती यांच्याशी सरळ संबंध आहे. वंचित वर्ग हा बहुदा आपल्या हक्काकरिता सशस्त्र क्रांतीकडे वळत असतो. परंतु डॉ. बाबासाहेबांनी या वंचित वर्गाला कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करण्याचे बाळकडू पाजले आहे. बाबासाहेब म्हणतात राष्ट्रवाद ही अशी सत्यस्थिती आहे की त्याला विसरता येत नाही किंवा नाकारता येत नाही.
डॉ. बाबासाहेबांचे भारतवासीयांना आवाहन होते की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. त्यांच्या अंगी लढवय्या पुरुषाची विरता नेत्याचे गुण आणि मुत्सद्यांची विवेक शीलता होती. ते म्हणाले होते तिरस्करणीय गुलामगिरीत मी अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वत:ला गोळी घालीन.
विभक्त मतदार संघाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात तीव्र मतभेद होते. बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती की राजकीय सत्ता हातात आल्याशिवाय दलितांचे प्रश्न सुटणार नाही म्हणून त्यांना विभक्त मतदार संघ मिळाले पाहिजे. कारण अस्पृश्य हे हिंदू समाजाचा भाग नाही ते अल्पसंख्यांक आहेत या उलट गांधीजींचे म्हणणे होते की दलितांना विभक्त मतदार संघ देण्यात येणार नाही. कारण ते हिंदू धर्माचा भाग आहेत. गोलमेज परिषद संपल्यानंतर ब्रिटीश प्रधानमंत्री रंमसे म्याकडोनाल्ड यांनी २0 ऑगष्ट १९३२ ला आपला जातींनिवाडा जाहीर केला. या निवाड्यानुसार प्रांतीय विधान मंडळात अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ इतर घटकांसोबत देण्यात आला. या निवाड्याविरुद्ध गांधीजींनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात २0 सप्टेंबरला आमरण उपोषण सुरू केले. या प्रश्नावर आणि गांधीजींच्या उपोषणावर देशात अत्यंत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये समझोता होऊन पुणे करार करण्यात आला.
देशातील सर्वच वर्गांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे तेच लोकशाहीचे खरे मूल्य आहे आणि म्हणून एक व्यक्ती एक मत हे मूल्य तत्त्व स्वीकारण्यात आले. पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. इतर पश्‍चिमात्य देशात आणि अमेरिकेतसुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार हा खूप उशिरा देणयात आला. पण भारतीय राज्यघटनेने प्रौढ मतदानाच्या अधिकाराची तत्त्व स्वीकारून फार मोठी कामगिरी केली आहे. दलितांच्या हितसंरक्षणाकरिता संविधानसभेत गेलेल्या डॉ. बाबासाहेबांनी महिलांसकट सर्वांना मतदानाचा आधिकार मिळाला पाहिजे या करिता आवाज उठविला आणि तो हक्क मिळविला हे त्यांचे खरोखरच मोठे राष्ट्रीय कार्य आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहरूजींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले, त्यामागे अनेक कारणे होती. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष व सनातनी प्रवृत्तींच्या लोकांनी हिंदू कोड बिलास केलेला विरोध होय.
स्त्रियांचे अधिकार आणि त्याबाबत हिंदूंची विधी प्रथा इत्यादी बाबत संहिता करणे आवश्यक आहे, असे डॉ. बाबासाहेबांना वाटत होते. नेहरूजींचा बाबासाहेबांना पाठिंबा होता. पण इतर सनातनी गट याचा प्रखर विरोध करीत होते. हिंदूंच्या धार्मिक बाबतीत बाबासाहेबांनी हस्तक्षेप करू नये अशी त्यांची भूमिका होती. मात्र बाबासाहेबांना वाटत होते की परिवर्तनासाठी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. हिंदू कोड बिलामुळे सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीत वाटा, घटस्फोट इत्यादी बाबतीत स्वातंत्र मिळाले असते. विद्यमान हिंदू कायद्यातील त्रुटी आणि अनिश्‍चितता नाहिसा करण्याच्या दृष्टिने डॉ. बाबासाहेब हे बिल आणू इछित होते.
व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. म्हणून त्यांना त्यांचा अधिकारपासून वंचित ठेवता येणार नाही ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. हिंदू कोडबिल जरी नाकरण्यात आले तरी १९५५-१९५६ ला नेहरूंनी या बिलावर आधारित स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने विवाह, घटस्फोट, दत्तक वारसा इत्यादी महत्त्वाचे कायदे पारित केले. हिंदू कोड बिल हे डॉ. बाबासाहेबांचे स्त्रियांच्या दृष्टीने उत्थंनाच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाउल होते. बाबासाहेबांचे नाव या देशाच्या इतिहासासाठी सदैव निगडीत राहील. दलित उद्धाराचा पाठपुरावा करताना त्यांनी राष्ट्राची प्रगती आणि उत्थान याकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही. ते प्रखर राष्ट्रभक्त आणि राष्ट्रौद्धारक आहेत. सामाजिक लोकशाही, राजकीय लोकशाहीचा मूळ आधार आहे. समतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. ते त्यांचे तत्त्वज्ञान आम्हा भारतीयांना सदैव प्रेरणादायी राहील.

No comments:

Post a Comment