Wednesday 22 April 2020

मलेशियातील 'बाबा संस्कृती'

15 व्या शतकात दक्षिण-पूर्व आशियात ,मुख्यत्वे मलेशियन द्वीप समुहात चिनी पुरुष आणि मुस्लिमेतर मलायी महिला तसेच दक्षिण भारतीय हिंदू पुरुष आणि मलायी महिला यांच्यात आंतरवंशीय विवाह व्यवस्था प्रस्थापित झाली होती. ज्यातून एक सर्वस्वी भिन्न अशी मिश्र संस्कृती उदयास आली. अशा विवाह संबंधातून स्थानिक भूमीवर जन्माला आलेल्या मुलांना व त्यांच्या पुढील पिढयांना 'प्रणाकान' (peranakan) म्हणून संबोधले जाते. 'प्रणाकान' हा मलायी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'स्थानिक भूमीवर जन्मलेला' असा आहे.
या शब्दालाच समानार्थी म्हणून 'बाबा' या शब्दाचा वापर होतो. बाबा म्हणजे फक्त वडील किंवा पुरुष नाही. ,तर संपूर्ण समाज असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. या समाजातील विवाहित स्त्रियांना 'बिबिक' असे म्हणतात. मलाक्का व पेनांग मधील चिट्टी मलाक्का (जे अंशतः भारतीय आहेत) लोकांच्या भाषिक सरमिसळीतून हे शब्द स्थानिक लोकांमध्ये रूढ झाले.
या विवाह व्यवस्थेतून व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर एकमेकांची सर्वस्वी भिन्न जीवनशैली, अपरिचित भाषा, खाण्यापिण्यातील विविधता,राहणीमानातील वैचित्र्य ,वैशिष्ट्य पूर्ण चालीरीती यांचा उदारपणे स्वीकार करणारा व त्या अन्वये एतद्देशियांवर सौहार्दाचे नाते रुजविणारा एक वेगळाच परिवर्तनशील समाज अस्तित्वात आला. चीन,मलेशियन द्वीपसमूह आणि भारत यांच्या दरम्यानच्या समुद किनारयांवर फोफावणारा व्यापार हे या समाजाच्या निर्मिती मागचं कारण होतं.
पंधराच्या शतकाच्या मध्यावर चीनच्या दक्षिणेकडील फुचिएन प्रांतातले हॉकीन्स, गुऑगडाँग प्रांतातले कॅटोनीज, तिऑच्युज तसेच हाका व्यापारी आणि खलाशी मोठ्या प्रमाणात मलेशियन द्वीप समुहात व्यापारासाठी येऊ लागले होते. हे व्यापारी वर्षाच्या शेवटी चिनहून मलेशियात येत आणि पाच महिने तिथेच वास्तव्य करीत. त्या काळी महिलांना चीनमधून बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. परिणामी दरवर्षी या व्यापाऱ्यांना हा काळ कुटूंबाशिवाय व्यतीत करावा लागे. त्यामुळे हळूहळू त्यांनी मुस्लिमेतर व स्थानिक अशा बाली, बुगी,बाताक वंशाच्या स्त्रियांशी विवाह करून मलेशियात दुसरी घरे थाटली. काही काळाकरिता जेव्हा हे व्यापारी मायदेशी जात ,तेव्हा या स्थानिक बायका त्यांच्या व्यापाराची काळजी घेत. या व्यापाऱ्यांनी मलेशियन जीवनशैली अंगिकारली असली तरी ही चिनी रीतीरिवाज मात्र सोडले नाहीत. चिनिमिश्रित मलायी भाषा ही त्यांची बोलीभाषा बनली. तिला 'बाबा मलाय' असे म्हणतात.
चिनी व्यापाऱ्यांप्रमाणेच भारतातील व्यापाऱ्यांनाही दक्षिण-पूर्व आशियात आपली पाळेमुळे रुजवली होती. दक्षिण भारतातील तमिळ हिंदू व्यापारीही याच दरम्यान मलेशियात येऊ लागले होते. त्यापैकी काहीजण मलायी स्त्रियांशी विवाह करून तिथेच स्थायिक झाले. त्यांचे वंशज 'मलाक्का चिट्टी' म्हणून ओळखले जातात. हे लोक तमिळ मिश्रित मलायी भाषा बोलतात. 18 व्या शतकात भारतातून दक्षिण आशियात आलेले नाटुकट्टाई चेट्टीयार आणि मलाक्का चेट्टी हे दोन पूर्णतः भिन्न समाज आहेत. काळाच्या ओघात चिनी प्रणाकान लोकांप्रमाणेच मलाक्का चिट्टी चे प्रमाणही घटले आहे. मलाक्कातही आता केवळ 300 ते 400 मलाक्का चिट्टी आपले अस्तित्व टिकवून आहेत. मलाक्काच्या मुख्यत्वे गजाह, बेरांग, टेंगकारा, आणि बँकांग भागात मलाक्का चिट्टी चे केंद्रीकरण झाले आहे. 15 व्या शतकात दक्षिण भारतात असलेल्या कोरोमॅडल किनाऱ्यावरून मलाक्कात आलेल्या व्यापाऱ्यांचे हे वंशज आहेत. सिंगापूर मधल्या रोवेल,किंटा आणि सेलेगी रोडवरही त्यांची काही कुटुंबे आढळतात. 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय आणि चिनी बाबांमध्ये जीवनशैली, पोशाख, चालीरीती अशा अनेक बाबींमध्ये साधर्म्य आहे.
इतर सर्वच संस्कृती प्रमाणे 15 व्या शतकात उदयास आलेल्या या 'बाबा' संस्कृतीतील अनेक परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. तथापि चिनी,मलायी व भारतीय खाद्य संस्कृतीच्या मिलाफातून जन्माला आलेले इटेक टीम, अयाम बुह, केलुअक, सांबाल बेलचान, व आचार हे खास प्रणाकान खाद्यपदार्थ मात्र देशीविदेशी खवय्यांच्या खाद्य यात्रेत आपले अविभाज्य स्थान टिकवून आहेत. सिंगापूरमध्ये एशियन सिव्हीलायझेशन म्युझियम आहे,इथे प्रणाकान (बाबा संस्कृती) थोडीफार पाहायला मिळते.

No comments:

Post a Comment