Sunday 26 April 2020

शहामृग

शहामृग. दिसायला उंच, झुपकेदार मान, उंच पाय. पाहताना कुतूहल वाटणारा हा पक्षी. मोठ्या आकाराचा, उडू न शकणारा हा पक्षी आहे. हा मुख्यत्वे आफ्रिकेत आढळतो. पक्षी असूनही याला उडता येत नाही, हे याचे वैशिष्ट्य. पण उडता येत नसलं तरी लांब पायांमुळे हा ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकतो.पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो.
शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असते. याची उंची आठ ते नऊ फूट आणि वजन दीडशे किलोच्या आसपास असते. याचे आयुष्यही इतर पक्ष्यांपेक्षा जास्त असून हा 40 ते 50 वर्षांपर्यंत जगतो. याला खूप उंच गवताळ प्रदेशात राहायला आवडते. गवत,फळ आणि झाडाची पाने याला खायला आवडतात. याला कळपात राहायला आवडते. एका कळपात 30 ते 35 शहामृग असतात. याचा जन्म अंड्यातून होतो. पक्षांमधील सर्वात मोठं अंडं शहामृगचंच असतं. एका अंड्याचं वजन दीड किलोपर्यंत भरतं. शेतकरी याचे पालन करून व्यवसाय करतात. याला कोंबड्यांप्रमाणे पाळलं जातं. यांच्या पिसापासून आणि त्वचेपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला कमी दिसतं आणि ऐकायलाही कमी येतं. पण वास घेण्याची क्षमता मात्र चांगली आहे. हा आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करतो व त्यांच्या रक्षणासाठी दक्ष असतो.

No comments:

Post a Comment