Thursday 16 April 2020

ताराबाई मोडक

ताराबाई मोडक ह्या एक मराठीभाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी' म्हणतात. ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या. केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले.
पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली. पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे 'लीलावती' आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते. याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९0६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्‍चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९0८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९0९साली ताराबाई मॅट्रिक झाल्या. ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १0१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत. प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता. शिक्षणतज्‍जञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठय़पुस्तक समितीवर त्यांनी अनेक वषर्ं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

No comments:

Post a Comment