Friday 17 April 2020

मनमोहक मोरांची वस्ती चिंचोली

नाच रे मोरा आंब्याचा वनात, नाच रे मोरा नाच हे गाण आठवतेय काय?? पावसामध्ये आपला पिसारा फुलवून नाचताना मोर किती मनमोहक वाटतो ना.परंतु आजकाल मोराला पुस्तकात किंवा फोटो मध्येच पाहावे लागते. मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरातील लोकांना एरवी प्राणिसंग्रहालयात पहावयास मिळणारे मोर या गावात मुक्तपणे वावरताना दिसतात. या गावाचे नाव आहे मोराची चिंचोली.

या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी. अंतरावर आहे. अजूनसुद्धा या छोट्याशा गावात तुम्हाला खूप मोर पहायला मिळतील. येथील लहान मुलांना मोर जणू मित्र असल्याप्रमाणेच वाटतात. सकाळी उठल्या उठल्या दार उघडल्यावर व्हरांड्यात मोर हिंडत असतात. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो.
या गावाची ही ओळख बदलण्यामागचा इतिहास मोठा रंजक आहे. चिंचोलीतील उत्तम जैववैविध्यामुळे पूर्वीपासूनच येथे मोर मोठय़ा संख्येने वास्तव्यास होते. दिसायला अत्यंत देखणा, आकर्षक असलेला हा पक्षी देवाचे वाहन असून, आपल्या गावाचे वैभव आहे, अशी गावातील पूर्वजांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी कधीच गावातील मोरांची शिकार केली नाही. उलट मोरांचा अधिवास टिकून राहावा, यासाठी त्यांनी शेताभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडे लावली. घरातल्या पाळीव प्राण्याला जपावे, त्याच पद्धतीने मोरांसाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केले. ही प्रथा पुढे चालत राहावी, यासाठी त्यांनी पुढच्या पिढीवर मोरांचा आदर करावा, असे संस्कारही केले. आज या गावात दोन ते अडीच हजार लोकवस्ती असून, तेवढय़ाच संख्येने मोर वास्तव्यास आहेत. गावकर्‍यांच्या बरोबर राहूनही मोर पाळीव झालेले नाहीत, हे विशेष.
आत्ताच्या २१ व्या शतकाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या सर्वसाधारण शहरी जीवनात प्रदूषणविरहीत मोकळ्या शुद्ध हवेत श्‍वास घेणे अशक्यच. हा आनंद येथील लोकं उपभोगत आहेत. मोराची चिंचोली हे हिरवेगार जंगलांनी वेढलेले आहे. नाचणारा मोर पाहण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ योग्य आहे. पावसाळा व हिवाळा हे मोरांचा आवडता काळ आहे. सकाळी ६.00 ते सकाळी ८.00 व संध्याकाळी ५ ते ७ ही मोर पाहण्यासाठीची उत्तम वेळ आहे. येथे सहलीला गेल्यावर एका गावात राहील्यावर जो आनंद घेता येईल तो घेता येतो. बाहेर फिरायला जाण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडीतून जावे लागते. आंब्याच्या, सिताफळाच्या मळ्यात मनसोक्त फिरता येते. तसेच शेतात झाडाला बांधलेल्या झोक्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. तिथे पहाण्यासाठी काही ठिकाणे आहेत. ती म्हणजे खटकली, पाटील मळा, थोरले मळा, महानुभाव वस्ती आणि खटकली वस्ती अशी काही ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. दोन दिवसाची सहल करण्याच्या दृष्टीने ही उत्तम जागा आहे. त्यात मोराचा सुंदर दृश्य तुम्हाला पहायचं असेल तर या गावाला आवर्जून भेट द्यावी.

No comments:

Post a Comment