Friday 24 April 2020

लोणार सरोवर

बालमित्रांनो, मी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. उल्कापातामुळे माझी निर्मिती झाली. बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर म्हणून मी जगप्रसिद्ध आहे. मित्रांनो, एव्हाना तुम्ही माझं नाव ओळखले असेलच! मो लोणार सरोवर. पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास तुम्हाला जाणून घायचा असेल तर आघाती विवरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठीच आज मी माझी जन्मकथा तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, साधारणपणे 50 ते 55 हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
अंदाजे 60 मीटर लांब आणि काही कोटी टन  वजनाच्या लघुग्रहाने आपल्या पृथ्वीवर जोरदार टक्कर दिली. या टकरीत 60 ते 70 लाख टन वजनाच्या अणुबाँब स्फोटाएवढी ऊर्जा निर्माण झाली. याचा परिणाम म्हणजे 1.83 किलोमीटर व्यासाचे आणि जवळपास 150 मीटर खोलीचे आघाती विवर (खोल खड्डा) तयार झाले. तुम्हाला परिचित असणारे लोणार सरोवर म्हणजेच हे विवर, बरं का!
माझ्या सभोवतालच्या परिसराचे पाच विभाग आहेत. पहिला म्हणजे उल्कापातामुळे झालेल्या विवराच्या बाहेरचा प्रदेश, उताराचा भाग, तेलाचा सपाट भाग, माझ्या भोवतालचा दलदलीचा भाग आणि शेवटचा भाग म्हणजे सरोवर. बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले जगातील सर्वात मोठे आघाती विवर, हे माझे प्रमुख वैशिष्ट्य आहे. माझ्या पोटातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्यात जवळपास 11 ते 12 विविध प्रकारचे क्षार आढळतात. क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यात कोणताही जीव जगूच शकत नाही. मित्रांनो, सर्वप्रथम माझा शोध कोणी लावला असेल, अशी उत्सुकता तुम्हाला निर्माण होणे स्वाभाविक आहे. से.जी.अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने 1823 मध्ये माझा अभ्यास केला, मात्र कित्येक वर्षे मी उपेक्षितच होतो. त्यानंतर 1965 च्या सुमारास आलेल्या एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना माझ्याविषयी थोडीफार माहिती मिळाली. अनेक संशोधन संस्थांनी 1972 मध्ये केलेल्या संशोधनाअंती मी आघाती विवर असल्याचे सिद्ध झाले. आणि खऱ्या अर्थाने मी जगाला परिचित झालो.तेव्हापासून आजपर्यंत असंख्य देशी-विदेशातील संस्था आणि व्यक्तींनी माझ्यावर संशोधन केले. जगात माझ्यासारखे केवळ तीन सरोवर असल्याने 'नासा'सारख्या संस्थांनीदेखील माझी दखल घेतली. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी आज देश-विदेशातील अभ्यासक मला भेट देण्यासाठी येतात.
माझ्या काठावर तसेच गावच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरामध्येच सामावली आहेत. माझ्या सभोवताली अनेक पुरातन वास्तूदेखील आहेत. या सर्व मंदिरांचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीने केलेले आहे. घनदाट झाडी, मंदिरे यामुळे इथे अभ्यासकांसोबतच भाविकही गर्दी करतात. माझ्या प्रमाणेच माझ्या आजूबाजूच्या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने हा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. मित्रांनो, मला एकाच गोष्टीची खंत वाटते, ती म्हणजे संवर्धन करण्याच्या नावाखाली माझा विदध्वंस जास्त होत आहे. माझ्या परिसरात इमारतींचे बांधकाम, धार्मिक विधी, खोदकाम, रस्त्यांचे डांबरीकरण असे बदल होत असल्याने संशोधकांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.  संशोधनाचे निष्कर्ष चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृपया, मला आहे तसेच राहू द्या, अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्यामुळे विज्ञान, निसर्ग आणि संस्कृती या तिघांचाही मेळ तुम्हाला माझ्या ठायी निश्चितच पाहायला मिळेल.

आघाती विवर म्हणजे काय?
अवकाशात अनेक आकाशगंगा, तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, अशनी कणांच्या स्वरूपातील उल्का सातत्याने गतिमान असतात. कधीतरी ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि त्यांची टक्कर होते. याचा परिणाम या वस्तूंचे वस्तुमान , आकार , घडण, वेग व दिशा बदलण्यात होतो. उल्का, अशनी किंवा तत्सम वस्तू पृथ्वीच्या  जवळपास आल्यावर पृथ्वीकडे आकर्षित होतात. पृथ्वीच्या वातावरणात शिरेपर्यंत त्यांचा वेग सुमारे 25 ते 60 किलोमीटर प्रतिसेकंद एवढा प्रचंड होतो.उल्का, अशनी लहान असल्यास  प्रचंड वेगामुळे पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन ते जाळून जातात. आणि आपल्याला उल्कापाताचे दृश्य दिसते. अशनी मोठा असल्यास तो पूर्ण जळत नाही. या न जळालेल्या भागाची पृथ्वीशी टक्कर होते. त्यावेळी त्याच्या गतिज ऊर्जेमुळे निर्माण होणारी उष्णता आणि अन्य ऊर्जा फारच मोठी असते. परिणामी, ज्या ठिकाणी लघुग्रह आदळेल, त्या ठिकाणी मोठा खळगा अर्थात विवर पडते. अशा अतिवेगवान व मोठ्या आकाराच्या वस्तूने आघात केल्यावर ग्रह व उपग्रहांवर पडणाऱ्या खळग्याला 'आघाती विवर' म्हटले जाते. ते वर्तुळाकार किंवा वाडग्याच्या आकाराचे असते. त्याची कडा उंचावलेली असते. आघात जास्त मोठा असल्यास एकापेक्षा जास्त वर्तुळाकार कडा तयार होतात.

No comments:

Post a Comment