Saturday 18 April 2020

भोपळ्याची शेती आणि सतार,तंबोरा वाद्य

सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.
 भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते.
शेतकरी साधारण श्रावणात किंवा दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा काळ जातो. या कालावधीत मिरजेतले सतार बनवणारे व्यावसायिक पंढरपूर, सोलापूरला जाऊन भोपळ्याची खरेदी करून, ते तिथेच वाळण्यासाठी ठेवतात. हा भोपळा वेलीवरच वाळलेला चांगला.
       शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो.
वेलीवर चार-पाच भोपळे लागले की शेतकरी ती वेल खुडून, वेलीची वाढ थांबवतात. त्यामुळे वेलीला तोवर लागलेले भोपळे चांगले पोसले जातात आणि त्यांचा आकार मोठा होतो. हा भोपळा चवीला कडू असतो. त्यामुळे माणसं किंवा जनावरं तो खात नाहीत. भोपळ्याचा देठ चांगला वाळला की तो तोडला जातो. साधारण मेपर्यंत भोपळा कडक उन्हामध्ये चांगला वाळला की व्यापारी टेंपोत भरून तो मिरजेला घेऊन येतात. मिरजेत दाखल झाल्यानंतर व्यापारी त्यांना पोटमाळ्यावर टांगून ठेवतात. पुढची किमान ५० वर्षं या भोपळ्यांना काहीही होत नाही. पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो, मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो, त्याला जो योग्य, सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाठी निवडला जातो. पुरुषांसाठी असणा-या भोपळ्याचा आकार तुलनेने मोठा असतो. चांगल्या वाळलेल्या भोपळ्याला कीड लागत नाही व तो वजनानेही हलका होतो. भोपळा ओला असेल तर कालांतरानं तो किडू शकतो आणि आकसतो. त्यामुळे वाद्य बनवताना अडचण येते. भोपळा दुकानात दाखल झाल्यापासून वापरात येईपर्यंत आणखी दोन-चार वर्षं निघून जातात. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर भोपळ्यांची किंमत भरमसाठ वाढते. मिरजेला दरवर्षी विविध आकाराच्या साधारण दोन हजार भोपळ्यांची आयात होते. हा पुरवठा करून जर भोपळा शिल्लक राहिला तर तो कलकत्त्याला पाठवला जातो. मिरजेशिवाय ही वाद्यं कलकत्ता आणि लखनौलाही बनतात.
अशी बनते सतार व तंबोरा

भोपळा देठाच्या बाजूने गोलाकार कापून आतल्या सर्व बाजूंनी साफ केला जातो. त्यानंतर भोपळ्याच्या आतली त्वचा मऊ व्हावी म्हणून त्यात पाणी भरले जाते आणि तो पाण्याने भरलेला भोपळा दोन दिवस त्याच स्थितीत ठेवला जातो. दोन दिवसांनी त्यातील पाणी आणि गर काढून टाकाला जातो. त्यानंतर, त्यात उभ्या आडव्या दिशेने लाकडी काठ्या घट्ट बसविण्यात येतात जेणेकरून त्याला दिलेला आकार हा ‘समाकार’ रहावा हा त्यामागील उद्देश असतो. त्याचवेळी त्याच्या गोलाकार भागाभोवती ‘तून’ किंवा ‘टून’चे लाकूड वापरून त्यापासून त्याचा गळा तयार केला जातो.
शेवटी लाखेचा वापर करून त्या गळ्यावर दांडी बसविली जाते. त्यानंतर भोपळ्यावर लाकडाची एक तबकडी बसविली जाते जेणेकरून भोपळा बंद होतो. यापुढे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यानंतर चार पाच वेळा पॉलिशचे हात दिले जातात. हे करत असतानाच या वाद्याचा रंग ठरविला जातो. शेवटी त्यावर खुंट्या, तारा आणि वाद्या बसवून हे वाद्य सूर जुळवून वाजविण्यासाठी सज्ज होते. अशा त-हेने सतार किंवा तंबो-याचा जन्म होतो.
       या भोपळ्या बरोबरच लाकूडही आवश्यक असते. पुर्वी हे लाकूड गंध देवदार जातीचं असायच. हे लाकूड वजनाला हलकं व लाल रंगाचं असतं. हे कर्नाटकातील सकलेशपूर जंगलातून येतं. पूर्वी सागवान सुध्दा वापरले जायचे, पण आज तेही महागल्याने ‘तून’ नावाच्या लाकडाचा वापर केला जातो. भोपळा व लाकूड यांचा पोकळ लाकडी साचा बनवून त्यावर नक्षीकाम केले जाते. वाद्यांवरती जे नक्षीकाम केलं जातं त्यासाठी पूर्वी हस्तीदंत, सांबरशिंगाचा वापर केला जायचा. पर्यावरण कायद्यातील अटी कडक झाल्यामुळे आजकाल या प्रकारचा माल वापरला जात नाही. त्याजागी सिंथेटीक मालाचा वापर केला जातो. लाकडाचीही आवक कमी झालीय.
        संगीत वाद्यांपैकी तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध असणारे मिरज हे सांगली जवळचे कृष्णाकाठावरचे संगीताची मोठी परंपरा सांभाळणारे शहर. किराणाघराण्याचे जनक अब्दुलकरीम खाँ साहेब यांची कर्मभूमी असणारी ही नगरी. विष्णु दिगंबर पलुसकर, विनायक बुवा पटवर्धन, भानुदास बुवा गुरव, वसंत पवार, राम कदम अशी वैभवशाली संगीत परंपरा असणा‍ऱ्या या गावात संगीतातील तंतुवाद्य निर्मितीची ही मोठीपरंपरा आहे.
        आदिलशाहीत विजापूरच्या बादशहाने अनेक कारागिरांना मिरज येथे पाठवून दिले. त्यापैकी शिकलगार कुटुंबीय मिरजेत स्थायिक झाले. त्यांचा मूळव्यवसाय भाला, बरची, तलवार अशी शस्त्रे बनविण्याचा. कालांतराने लढाया कमी झाल्याने शस्त्रांची मागणी कमी झाली आणि चरितार्था साठी इतर व्यवसायांकडे वळावे लागले. त्यात या कुटुंबातील मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना संगीताची उत्तम जाण होती. मिरजेचे सरकार पटवर्धन यांना ही संगीताची आवड आणि आस्था होती. त्यांनी मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना गणेश कलागृहात पाचारण करून तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. फरीद साहेब यांनी आपली कल्पकता पणाला लावून भोपळा, लाकूड आणि तारांनी बनविलेल्या तंतुवाद्यात ध्वनिलहरीतील सप्तक जखडून ठेवले आणि पहिल्या वहिल्या तंबो‍ऱ्याची निर्मिती झाली.

No comments:

Post a Comment