Sunday 11 October 2020

निसर्ग सौंदर्याने नटलेला रत्नागिरी


कोकणातील पावसामुळे कोकणचे सौंदर्य आणखीणच खुलून दिसते. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच धबधबे ओसंडून वाहतात. पूर्वी कोकणात उन्हाळी पर्यटनासाठी लोकांची गर्दी व्हायची. परंतु आता पावसाळी पर्यटनासाठी लोकांची गर्दी कोकणात होत आहे. 

निवळीचा धबधबा : मुंबई - गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना संगमेश्‍वरपासून २0 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणार्‍या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणार्‍या पायर्‍या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात मात्र दुरूनच सौंदर्य न्याहाळलेले अधिक चांगलं.

वीरचा धबधबा : तुरंबव येथून आबलोलीकडे जाताना १0 किलोमीटर अंतरावरील वहाळ या गावापासून वीर बंदर १0 किलोमीटर अंतरावर आहे. वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणार्‍या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणार्‍या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो.

सवतसडा धबधबा : चिपळूणपासून ५ किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते.  चिपळूण आणि सवतसडा धबधब्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला पेढे या गावातील दत्त मंदिरही भेट देण्यासारखे आहे.

रानपाटचा धबधबा : मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करताना संगमेश्‍वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. गावापासून गणपतीपुळे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. परिसरातील हिरव्या निसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते.

मार्लेश्‍वर धबधबा : संगमेश्‍वर तालुक्यात देवरुख पासून १८ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य दर्‍याखोर्‍यात वसलेले श्रीक्षेत्र मार्लेश्‍वर श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर हे देवस्थान आहे. या डोंगरावर एक मोठा धबधबा आहे.

रत्नागिरी हे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान आहे. वयाच्या दहा वर्षांपर्यंत तेथे त्यांचे वास्तव्य होते. आपण लोकमान्य टिळक यांच्या वास्तव्याचा टिळकवाडा आणि मूळ वापरात असलेल्या काही वस्तू तसेच त्यांचे जुने फोटो, वर्तमानपत्रातील कात्रणे पाहू शकता.

थिबा राजवाडा : थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१0 मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment