Wednesday 14 October 2020

वाचन प्रेरणा मिळणे आवश्यक


वाचन प्रेरणा दिन आणि एपीजे कलाम यांची जयंती हा उत्तम योग आहे.ते फार चांगले वाचक होते. गीता आणि कुराण असा सर्वांगीण वाचनाचा पैस होता त्यांचा. वाचन प्रेरणा दिन... असा एक दिवस साजरा करून ती प्रेरणा देता येईल की नाही, हे माहीत नाही; पण सुरुवात तर करायला हवीच. ठरीव कोलांट-कोट्या न करता सरळ विषयाला भिडायचे तर ही प्रेरणा कुणाला देणे आवश्यक आहे? हे ठरवावे लागेल. त्याचे उत्तर असे आहे की ती जवळजवळ 'सगळ्यांनाच' आहे; पण मुख्यतः शाळेतल्या मुलांना. शाळेतून ती प्रेरणा मिळणे अत्यावश्यक आहे. मुळात भाषेचे गुण हे कोणत्याही महत्त्वाच्या परीक्षेसाठीच्या चढाओढीत ग्राह्य धरायला सुरवात केली तर त्यातला मुलांचा रस वाढेल आणि मगच वाचनाची प्रेरणा त्यांच्या ठायी बिंबायला सुरवात होईल. भाषा विषयातसुद्धा प्रश्न- उत्तरे हाच साचा दिसतो. त्यात वाचनावर भर द्यायला हवा. या मुद्द्यावर सविस्तर लिहिता येईल. विद्यार्थी मग ते शाळा- महाविद्यालयांतील असोत किंवा काही कलेत शिक्षण घेणारे असोत, भाषा थोडीफार अनिवार्य करायला हवी. येत्या नव्या अभ्यासक्रमात तसा समावेश असेल, याची आशा वाटते. भाषेबद्दल आशा वाटण्याआधी आपल्या संस्कृतीविषयी आस्था वाटायला हवी. येथुनच या विषयाला सुरवात होते.

वाचनास प्रेरणा देण्यासाठी वाचनालये, शिक्षण खाते आणि शाळा वगैरे यांनी दीर्घकालीन धोरणे आखली पाहिजेत. 'भिलार'सारखी वाचन गावे अनेक ठिकाणी, प्रत्येक शहराच्या जवळपास वसवली पाहिजेत. एकट्या महाराष्ट्राएवढी लोकसंख्या असलेल्या युरोपीय देशांत आपल्या दहापट किंवा भव्य ग्रंथालये आढळतात. त्यामुळेच हॅरी पॉटरचे नवे पुस्तक मिळवण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागतात व पुस्तकांची पहिली आवृत्ती काही लाखाची असते. वाचन प्रेरणा कुणीही कुणालाही द्यावी. शिक्षकांनी मुलांना, पालकांनी पाल्यांना, आपण आपल्या जोडीदारांना वगैरे. आई-बाबा वाचन करताना दिसले तरच मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. शिक्षकांनी वाचनाच्या तोंडी परीक्षा घ्यायला हव्यात. स्पर्धेच्या युगात बक्षीस मिळवण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांकडून काही वाचून घेतील आणि मग त्यांना वाचनाची गोडी लागली की, त्याची गाडी धावायला लागेल. रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचनाची आवड असेल तर इतर अनेक विषय अथवा साहित्य वाचनाची गोडी मुलांत निर्माण होऊ शकते. पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज वर्तमानपत्र तथा विविध पुस्तके वाचनाची आवड निर्माण करायला हवी. या सगळ्या गोष्टी अमलात आणताना आपण एक पथ्य मात्र आवर्जून पाळले पाहिजे; ते म्हणजे किचकट फॉर्मस, अतिशय बारीक फॉन्ट असलेली परिपत्रके किंवा अत्यंत अशुद्ध पद्धतीने लिहिलेले साहित्य वाचू देऊ नयेत. त्याने त्यांना वाचन प्रेरणा मिळण्याऐवजी वाचन आणि भाषा यांविषयी तिटकाराच निर्माण होईल!


No comments:

Post a Comment