Thursday 29 October 2020

स्मार्ट मोटारगाड्या


सध्या मोबाईल फोनप्रमाणेच मोटारागाड्याही स्मार्ट व स्वयंचलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. इस्त्रायलबरोबर अनेक देश-कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. शेवटी हा सगळा उद्योग माणसाला आरामदायी प्रवास करता यावा,यासाठी चालला आहे. रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण आणि जायबंदी होण्याचे प्रमाण चिंता करण्यासारखे आहे. खरे तर मोटारगाड्या चालवताना चालकाला सदैव सावध राहावे लागते. गाडीखाली कुणी येणार नाही,गाडीची अन्य वाहनाशी टक्कर होणार नाही.कुठेतरी जाऊन कार आदळणार नाही. अनावधानाने लाल सिग्नल ओलांडून कार पुढे जाणार नाही. वगैरे काळज्या चालकाला घ्याव्या लागतात. पण ही सर्व कामे स्वतःहून व्हायला लागली तर कुणाला नको आहे. आणि खरोखर तसाच प्रयत्न आज जगभर चालला आहे. गुगलने चालकविरहीत मोटारगाडी तयार केली, पण तिला अपघात झाला. पण तरीही प्रयत्न सुरूच आहे. इस्त्रायलमध्ये चालकाला गाडी चालवताना फार कष्ट घ्यावे लागू नयेत किंवा चालकाला मदत व्हावी, अशी स्वयंचलित यंत्रणा तयार केली जात आहे. यासाठी रडार,लेसर,ब्लुटूथ तंत्राचा वापर होतोय, शिवाय मोटारगाड्या विजेवर चालाव्यात यासाठीही हे स्टार्टअप प्रयोग करत आहेत. मोटारगाडीचा अपघात होण्याच्या हजारावर शक्यतांचा अभ्यास करून ते टाळण्याचे उपाय शोधण्यात येत आहेत. मोटारागाडीच्या आसपास येणारी वाहने ,माणसे , आसपासचे विजेचे खांब,झाडे, अन्य अडथळे, समोरून येणारी वाहने, मागून येणारी वाहने, त्यांचा वेग, ओव्हरटेक करताना होणारे अपघात हे सर्व टाळण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरून गाडया स्मार्ट बनवल्या जात आहेत. परंतु तेवढ्यावरच न थांबता अचानक, अकस्मात व अनपेक्षित पद्धतीने होणारे अपघात कसे टाळावेत यावरही स्टार्टअप्स अधिक संशोधन करत आहेत. म्हणजे समोरून अचानक पाण्याचा किंवा पुराचा लोंढा आला तर मोटारगाडी स्वतः या संकटाचे विश्लेषण करून  गाडीला अपघातापासून वाचवू शकेल. दरी, बर्फ पडून रस्ता झाकला गेला असेल तर मोटार त्यातून मार्ग काढू शकेल का, वाहनांसमोर येणारे खड्डे, अन्य अडथळे यांचे एकदम विश्लेषण करून गाडी स्वतःहून निर्णय घेऊन संभाव्य अपघात टाळू शकेल का, यावरही संशोधन चालू आहे.  कारच्या विश्वात मोठे क्रांतिकारी बदल दिसत आहेत. सध्याच्या घडीला कारमध्ये बिल्ट इन आणि एक्सेसरीजसारख्या काही उपयोगी फिचर्स जोडले जात आहेत. उपयोगी गॅझेट्स इंस्टॉल करून कारला सुपर स्मार्ट कारमध्ये परिवर्तन करता येऊ शकते. क्यूएनएक्स, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स, डेलफी आणि एनवीडियासारख्या कार कंपन्या अशा गॅझेट्सचा वापर करत आहेत. आणखी संशोधने टप्प्याटप्प्याने गाड्यांमध्ये येतील आणि वाहन चालवणेदेखील सुलभ होऊन जाईल. अशी प्रगती कुणाला नको आहे? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment