Friday 30 October 2020

रेहेकुरी अभयारण्य


नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात  रेहेकरी काळवीट  आहे. हरणांच्या कुरंग गटातील काळविटांसाठी ते आरक्षित आहे. काळवीट रक्षणाचा कायदा झाल्यानंतर १९८०मध्ये या अभयारण्याची स्थापना झाली. याचे क्षेत्रफळ २.१७ चौरस किलोमीटर इतके आहे.येथील माळरानात लावलेल्या विविध प्रकारच्या गवतात शेकडो काळवीट  बागडत आहेत. खुरटी झुडपं आणि गवताळ  प्रदेशात राहणारा काळवीट हा अॅटलोप वर्गातील  आहे. काळविटाखेरीज येथे माळठिसकी,  म्हणजे चिंकारा (इंडियन गझेल) हा तांबूस  पिंगट रंगाचा प्राणी दिसतो. गवतात चरणारे,  खुल्या माळरानावरून धावणारे काळवीट आणि  चिंकारा पाहणे आनंददायी असते. वेगाने धावणारे व दुडुदुडु उड्या मारणारे  हरीण सर्वांना आवडते. हरणांमध्ये दिसायला  सुंदर, वेगवान आणि चपळ अशी काळविटाची  ओळख आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग  गवताळ कुरणे आणि बाभळीच्या झाडांनी  व्यापला आहे. रेहेकुरी अभयारण्य काळविटांमुळे  पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.  महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येथे काळवीट पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना  काळविटाबरोबरच कोल्हा, लांडगा, चिंकारा, साळिंदर, लांडगा,  तरस, मुंगूस, खोकड आदी वन्यप्राण्यांचेही दर्शन घडते. वनस्पतींमध्ये कडुनिंब, बोर, तरवड, खैर, हिवर, बोर, बाभूळ, मारवेल, डोंगरी, कुसळी, पवन्या आदी झाडांबरोबरच अभयारण्यात झाडे आणि झुडपांच्याही विविध प्रजाती आहेत.प्रमुख पक्ष्यांमध्ये घार, भारद्वाज, चंडोल, सुतार, तितर,  माळढोक, कापशी, सातभाई इत्यादींचा समावेश आहे. अभयारण्याच्या परिसरात १९८०मध्ये काळविटांच्या संख्येत कमालीची घट होऊन केवळ १५ ते २० काळवीट उरले होते. त्यामुळे काळविटांचे संरक्षण करण्याच्या खास हेतूने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.

रेहेकुरी अभयारण्य हे शुष्क काटेरी वन या प्रकारामध्ये येते. या अभयारण्याचा परिसर प्रामुख्याने गवताळ असल्याने या परिसरातून चालण्याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो. त्याचप्रमाणे पर्यटक येथे दुर्बिणीद्वारे काळवीट व इतर प्राणी पाहण्याचाही आनंद घेतात. शिवाय रेहेकुरी अभयारण्याजवळ भेट देण्यासारखी इतरही ठिकाणे आहेत. अभयारण्याजवळच असलेल्या भिगवण येथील तलावावर विविध फ्लेमिंगोंसह स्थलांतरित व मूळ रहिवासी असलेले विविध जलपक्षी पाहण्याचा अनुभव घेता येतो. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी आहे. सुरुवातीला काळविटांची संख्या कमी असल्याने फारशी अडचण येत नव्हती. मात्र, काळविटांची संख्या वाढत असल्याने अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे.


No comments:

Post a Comment