Saturday 3 October 2020

'डॅनाइड एगफ्लाय': वाघाच्या समांतर सुरक्षा


मेळघाटासह महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या 'नाइड एगफ्लाय' नामक फुलपाखरू वन्यजीव कायद्याच्या 'शेड्यूल वन'मध्ये वाघासमवेत समाविष्ट आहे. वाघाला इजा पोहचविणाऱ्याला जी शिक्षा आहे,  तेवढीच शिक्षा या फुलपाखराला इजा पोहचविणायला होऊ शकते. तशा भारतात फुलपाखराच्या तब्बल १५०१ जाती आढळतात. त्यापैकी ४५० जातींच्या फुलपाखरांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ब्लू नवाब, ब्लू बॅरन, डॅनाइड एगफ्लाय, मलबार बँडेड स्वॅलोटेल आणि क्रिम्सन रोझ या जाती भारतात अतिसंरक्षित आहेत. फुलपाखरांच्या चोरटया बाजाराची उलाढाल करोडो रुपयांमध्ये असल्याने जंगलांमधील फुलपाखरांवर त्यांच्या नैसर्गिक शत्रूंबरोबरच या शिका-यांचेही गंडांतर आहे. जगातील सर्वात सुंदर असा मान असलेल्या या कीटकाचे अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान आहे. इको सिस्टीममध्ये कोणताही बदल झाल्यास सर्वात आधी त्याचा फटका या नाजूक कीटकास बसतो. 

 यापूर्वी मध्य प्रदेश आणि विदर्भ मिळून सेंट्रल प्रोव्हिन्सेस अंतर्गत  १९३१ मध्ये डी. अबरू यांनी, तर  झॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे  महाबल यांनी २००५ मध्ये  मेळघाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला. महाबल यांनी मेळघाटातील  ४५ जातींच्या फुलपाखराची नोंद आपल्या अहवालात केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात कार्यरत जयंत वडतकर यांनी २००५,   २००६ व २००७ मध्ये सलग तीन वर्ष  मेळघाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला. यात त्यांना सहा  कुळांतील १३० प्रजातीची फुलपाखरे आढळून आलीत. त्यात या 'डॅनाइड एगफ्लाय' नामक फुलपाखराचा समावेश आहे.

मेळघाटातील फुलपाखरे ज्या वनस्पतीवर अंडी घालतात, अशा १०१ खाद्य वनस्पती व ज्या वनस्पतीवर बसून मध घेतात, त्या २८ मध वनस्पतीचीही जयंत वडतकर  यांनी नोंद घेतली. मेळघाटातील  जंगलात आढळून येणाऱ्या  रायमुनिया आणि कंबरमोडी  वनस्पतीच्या फुलांना फुलपाखरे अधिक भेटी देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. गावाशेजारी, गावाभोवती आढळून येणारी पिवळी फुलपाखरेही मेळघाटात आढळून येतात.

'डॅनाइड एगफ्लाय' नावाचे फुलपाखरू वाघाच्या समांतर सुरक्षा प्राप्त आहे, अशा या फुलपाखराचा रंग पंख बंद असलेल्या उभ्या स्थितीत तपकिरी भुरकट असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या छटा व  ठिपके दर्शवितात. पंख उघडल्यानंतर आडव्या स्थितीत आकर्षक असा गर्द काळा रंग व त्यावर वरच्या भागात दोन्ही बाजूला दोन लहान उभे पट्टे आणि खालच्या भागात दोन्ही बाजूला निळसर रंगाचे दोन आकर्षक गोल भरीव ठिपके आढळून येतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment