आपल्याकडे प्रत्येक देवतेला अभिवादन करताना, आराधना, उपचारादी पूजन आणि स्तवन करताना निर्माण होणार्या मंगल लहरींची, उत्सवी वातावरणाची अनुभूती घेताना सलग काही दिवसांच्या उपचारांची परंपरा पहायला मिळते. या धर्तीवर आपण रामाचं, देवीचं, शाकंबरीचं, मल्हारी मार्तंडाचं नवरात्र साजरं करतो. या ठराविक काळात चराचरात त्या त्या देवतेचं तत्व प्रभावी असतं अशी कल्पना करुन तिचे आशीर्वाद घेण्याची परमसंधी असते, असंही धर्मशास्त्र सांगतं.
शक्तीपाशी अभय मागणं आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण यातून मिळणारी मानसिक शांतता आणि समाधानच आपल्या अंगी संकटांविरुद्ध लढण्याचं बळ प्रदान करेल. नवरात्रीत आपण आदिमायाशक्तीला आवाहन करतो, पूजा-अर्चनेच्या माध्यमातून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आणि तिची आपल्यावरील कृपा अभंग रहावी अशी कामना व्यक्त करतो. मात्र हे सगळं करताना आधी आपल्या मनात स्त्रीशक्तीविषयी किती आदर, आत्मियता, आस्था आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण कोणत्याही उत्सवापूर्वी घराची स्वच्छता आवश्यक असते, तशीच कधी तरी मनाची, वृत्तीची आणि प्रवृत्तीची स्वच्छताही व्हायला हवी. विशेषत: निर्भया प्रकरणानंतर समाजातल्या लिंगपिसाट प्रवृत्तींवर जोरदार प्रहार झाल्यानंतरही त्याच तीव्रतेचं हाथरस प्रकरण घडलं आणि पुन्हा तसाच माध्यमस्नेही पाठिंबा आणि राजकारणपुरस्कृत अश्रूपुराण पहायला मिळालं; त्यावरुन साफसफाईचं बरंच काम अजून बाकी आहे हे समजून घ्यायला हवं. चौकाचौकात देवीचे मांडव घालण्याची परवानगी मिळावी यासाठी भांडणारे लोक प्रत्यक्षात घरातल्या स्त्रीशक्तीचा मान ठेवतात का हे पहायला हवं. अन्याय झाल्यानंतर पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढण्यापेक्षा असे अन्याय रोखण्याकडे सामाजिक प्रयत्नांचा कल रहायला हवा. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समाजाचं या अंगाने होणारं प्रबोधन स्त्रीशक्तीचा खरा जागर करणारं ठरेल असं म्हणता येईल.
एकीकडे असा सामाजिक आशय पहायला मिळत असताना धार्मिक अथवा आध्यात्मिक अंगाने नवरात्रीचं वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. दरवर्षीप्रमाणे सळसळता उत्साह नसला तरी आता नवरात्रीच्या तयारीचा जोर वाढतो आहे. नवरात्र सुरू होण्याच्या काही दिवस आधी गावाजवळील ओढ्यावर, नदीवर, तळ्याकाठी वा आपापल्या शेतात बहुतांश स्त्रिया एकत्र येतात.येताना घरातील सर्व कपडे धुण्यासाठी सोबत आणलेले असतात. वाहत्या, मोकळ्या पाण्यात सर्वजणी एकमेकींच्या सहकार्याने कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडतात. धुतलेले कपडे काठावर वाळत घातले जातात. या ठिकाणी लवकर येणं, येताना जेवणाचा डबा बरोबर आणणं, एकत्र जेवण आणि थोडी विश्रांती, नंतर सायंकाळी धुवून वाळवलेले सर्व कपडे घेऊन घराकडे परतणं हा कार्यक्रम ठरलेला असतो. पुरेशी स्वच्छता झाल्याशिवाय नवरात्राचं पुरेपूर समाधान मिळत नाही, अशी अनेक स्त्रियांची भावना असते.
नवरात्रात घरोघरी घट बसवले जातात. या घटाचं महत्त्व मोठं आहे. या घटासाठी पवित्र ठिकाणची माती आणून त्यात गहू, हरभरे, जोंधळे, भात, जवस, सातू, राळे, उडीद, मका अशी सात धान्यं पेरायची. त्यावर कलश ठेवायचा. कलशात सप्त नद्यांचं पाणी भरायचं. पाण्यात सोनं, चांदी, मोती, प्रवाळ, चांदीचं-तांब्याचं नाणं घालायचं. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, सुपारी वहायची. घटावर अंबेची प्रतिष्ठापना करायची. रोज नव्या फुलांची माळ देवीच्या मस्तकी रूळेल अशा पध्दतीने सोडायची. नऊ दिवस रोज नवी माळ… एकदा स्थानापन्न झालेल्या देवीला नऊ दिवस, नऊ रात्र हलवायचं नाही. रोज सवाष्ण जेवू घालायची. देवीचं वैशिष्ट्य असं की ती नऊ दिवस आणि नऊ रात्र झोपत नाही. अर्थातच भक्तानेही नव-रात्र जागरण करायचं, नऊ दिवस उपवास करायचा. परंपरेनुसार अहोरात्र तेलाचा वा तुपाचा नंदादीप देवीसमोर तेवत ठेवायचा. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार यात थोडाफार फरक असेल. पण मुळात ही पूजा सृजनाची, निर्माणशक्तीची ! तिची तयारी सध्या घरोघर सुरू आहे.
ही देवी आदिमाता आहे. देवांनाही ‘त्राहि माम्’ करुन सोडणार्या महिषासुराचा वध करण्यास ती सिद्ध झाली आहे. तिचं रूपडं पहा. ती अष्टभुजा आहे. शिवाने दिलेलं त्रिशूळ, विष्णूने दिलेले सुदर्शन चक्र, वायुदेवाने दिलेले धनुष्य आणि बाणांचा भाता, अग्निदेवाने दिलेली गदा, महाकाळाने दिलेली तलवार, यमाने दिलेली ढाल, इंद्राने दिलेला अंकुश, वरूणदेवाने दिलेला नागपाश आणि विश्वकर्म्याने दिलेली कुर्हाड अशी आयुधं आपल्या आठ हातांमध्ये घेऊन ती असुराचा नाश करण्यास सिद्ध आहे. सर्व शक्तींचे प्रतीक असलेला सिंह हेच तिचं वाहन आहे. कोलकत्यातील ती दुर्गा किंवा कालीमाता आहे. गोव्यात शांतादुर्गा, म्हाळसा, कामाक्षी आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, रेणापूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही देवीची तीन शक्तीपीठं आणि वणीची सप्तशृंगनिवासिनी जगदंबा हे देवीचं अर्धं शक्तीपीठ आहे.
No comments:
Post a Comment