Saturday 17 October 2020

रांगोळीचा इतिहास


रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही आढळली आहेत. अल्पनेचा समावेश हा कामसूत्राने वर्णन केलेल्या चौसष्ठ कलांमध्येही होतो. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. अल्पना या शब्दाची उत्त्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली. याचा अर्थ लेप करणे असा आहे.  प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभांच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो.

रांगोळीचा उद्देश.

रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे, असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाच्या सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते.

विविध प्रांतातील रांगोळी-रांगोळीचा जसा इतिहास मोठा आहे तसंच विविध प्रांतातील तिची ओळखही वेगवेगळी आहे. केरळमध्ये पुविडल, राजस्थानमध्ये मांडणा, बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशमध्ये मुग्गु, तामिळनाडूमध्ये कोलम जी मुख्यतः तांदूळाने काढली जाते. मध्यप्रदेशमध्ये चौकपूरना अशी भारतातील विविध भागात रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. महाराष्ट्रातील काही आदिवासी जमातींमध्ये तर रांगोळी अशा पद्धतीने रेखाटली जाते की, त्याला वारली पेटींग म्हणून ओळखलं जातं. या वारली पेटींगमधील काही आकार लग्नघरात रेखाटणं हे शुभ मानलं जातं.

रांगोळीसाठी लागणारं साहित्य-पांढरी रांगोळीही मुख्यतः गारगोटीच्या दगडापासून बनवली जाते. जी रंगाला पांढरी आणि पावडरसारखी असते. पारंपारिक रांगोळ्यांमध्ये तांदूळाचा, कुंकूवाचा, हळदीचा किंवा अगदी गव्हाच्या पीठाचाही वापर करण्यात यायचा. फुलांच्या रांगोळीसाठी खास विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आजकाल रांगोळीमध्ये रंग म्हणून रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो. इको फ्रेंडली रांगोळी साकारताना ती मुख्यतः तांदूळाच्या पीठाने, फुलांनी किंवा अगदी लाकडी भुस्स्याने ती साकारली जाते.

रांगोळीतील प्रमुख तत्त्व- रांगोळीमध्ये मुख्यतः स्वस्तिक, कमळाचं फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्म यांसारख्या समृद्धी आणि मंगल चिन्हांचा समावेश असतो. ही चिन्ह म्हणजे एक प्रकारे सांकेतिक भाषा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यांसमोर नित्यनेमाने रांगोळी काढली जाते. ज्यांना हाताने रांगोळी काढणं शक्य नसतं ते रांगोळीच्या छाप्यांचा वापर करतात. आनंद आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणजे विविध रंगी रांगोळी होय.

No comments:

Post a Comment