Saturday 24 October 2020

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर


कोल्हापूर येथे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. पुराणात उल्लेखलेल्या १0८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६00 ते ७00 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.

कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४0 किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात लिंगशैषाघौषहारिणी असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्‍चिमाभिमुख असून महाव्दार पश्‍चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्‍चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका 0.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दृष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालणार्‍या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभार्‍यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. 

No comments:

Post a Comment