Sunday 18 October 2020

गुहागरचे निसर्गसौंदर्य

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्‍वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनार्‍याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. व्याडेश्‍वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.

गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनार्‍यावर केलेली आहे.

गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता. दगडी बांधणीचे व्याडेश्‍वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्‍चिम दिशेला केलेले आढळते.

गुहागर हे अतिप्राचीन म्हणजे भगवान परशुरामांच्या काळापासून अस्तित्वात आहे असे मानतात. गुहागरची खरी प्रसिद्धी आहे ती श्री व्याडेश्‍वर या सुंदर देवस्थानामुळे. गुहागर हे अतिशय सुंदर गाव आहे. पूर्वेकडच्या डोंगराला पाठ टेकवून समोरच्या अथांग सागरतीरावर नारळी पोफळीच्या दाट झाडीत गुहागर लपले आहे. 

बामणघळ, हेदवीला जाऊन तिथला जलस्तंभ न पाहाता परत येणे म्हणजे एका निसर्गनिर्मित चमत्काराला मुकणे होय! हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. हेदवीच्या गणेश मंदिराजवळ तीन किलोमीटर अलीकडे समुद्रकिनार्‍याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो.

शतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १0 मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १0 ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ! त्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणार्‍या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. 

गुहागर तालुक्यातील एक अतिशय प्रसन्न व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणजे वेळणेश्‍वर. इथल्या प्राचीन शिवमंदिरासाठी व सुंदर समुद्र किनार्‍यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिध्द आहे. वेळणेश्‍वर मंदिर परिसरात पोहोचल्याबरोबर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या अतिशय सुंदर व भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदिराचा मूळ गाभारा खूप प्राचीन काळातील असून, सुमारे ४00 वर्षांपूर्वी हे आताचे मंदिर बांधून काढले असे म्हणतात. १२00 वर्षांपासून हे गाव या किनार्‍यावर वसले आहे. 

No comments:

Post a Comment