Saturday 3 October 2020

स्वामी रामानंद तीर्थ


स्वामी रामानंद तीर्थ (व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९0३ रोजी झाला. संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्हय़ातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्हय़ातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. १९३0 मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्‍वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.

हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या 'रझाकार' या दहशतवादी संघटनेने मराठवाड्यातील हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणार्‍या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली. 

हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा, अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 'व्हिजन' हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई र्शॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख सर्मथक होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलिस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले. लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

No comments:

Post a Comment