Thursday 8 October 2020

फुलांच्या जगात- कंदिलपुष्प


आकाश कंदील सारखी या वनस्पतीच्या फुलाची रंगीबेरंगी सुंदर रचना असल्यामुळे याला 'कंदिलपुष्प' म्हणतात. फुले कंदिलासारखी असल्याने त्यांना कंदिलपुष्प असेही म्हणतात. वनस्पतीची फुले हनुमानाच्या गदेसारखी असतात,आणि त्यांना जमीनीत एक बटाट्यासारखा कंद असतो. त्यामुळे त्यांना हनुमान बटाटा हे नाव आहे. फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असून त्यावर लाल, जांभळ्या ठिपक्यासोबतच रेघांची सुंदर नक्षी असते. जुलै ते ऑक्टोबरमध्ये उमलणाऱ्या कंदीलपुष्पाचे तब्बल ६१ प्रकार भारतामध्ये बघायला मिळतात. महाराष्ट्रात २५ प्रकारचे कंदीलपुष्प बघायला मिळतात. डोंगर, कडे-कपारीत काही वेळा ही फुले वेली अथवा झुडपामध्येही आढळून येतात. परंतु गेल्या काही वर्षात कमी होणारे पर्जन्यमान, रासायनिक शेतीमुळे परागीकरण करणा-या मधमाशा व कीटकांची कमी होणारी संख्या, तसेच या वनस्पतीची कंदमुळे गुराख्यांनी खाण्यामुळे या वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक रंगीबेरंगी विविध आकाराची रानफुले डोंगरमाथ्यावर, कडे-कपारीत आपल्याला दिसतात. परंतु या फुलझाडांची माहिती व परिस्थिकीमधील त्यांचे महत्त्व माहिती नसल्यामुळे आपण पायदळी तुडवून त्यांचे नुकसान करतो. निसर्गात आढळणा-या प्रत्येक वनस्पती व त्यांच्या फुलाला वेगळेपण दिलेले आहे. परागीभवन होण्यासाठी उपयुक्त  कीटकांना आकर्षित करण्यासाठी काही फुलांना आकर्षक रंग, तर काही फुलातील मकरंदाला गोड स्वाद दिला आहे. या सर्वांला भुलून कीटक फुलांच्या आसपास घोंगावत असतात. कंदिलपुष्पाच्या रंगाला व मधाला भुलून अनेक कीटक आकर्षित होतात. फुलातील मधाच्या लालसेने व दर्पामुळे तसेच फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजूला नळीवर उतरण्याची जागा आणि पुढे कुठे जायचे ते दाखवणारे ठिपके याचा आधार घेत हे कीटक खाली जातात खरे परंतु, बाहेर येण्यासाठी वर येताना तंतू उलट्या दिशेने असल्यामुळे परागकणाजवळ गेलेल्या कीटकाला पुन्हा बाहेर पडता येत नाही. ज्यावेळी हे फूल कोमेजून मलूल होते त्यावेळीच हे कीटक बाहेर पडतात. कंदिलपुष्पाच्या विविध प्रजाती पश्चिम घाटातील ठाणे, रायगड, माथेरान, खंडाळा, माळशेज, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, चांदोली, राधानगरी परिसरात पाहायला मिळतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment