Saturday 17 October 2020

नवरात्र:शक्तीची निर्मिती


नवरात्रामध्ये सगळा भारत मातृरूप शक्तिपीठांच्या आराधनेमध्ये रममाण होत असतो. आपल्या राज्याच्या भूमीमध्येसुद्धा साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका आणि वणीची सप्तश्रृंगी असे या साडेतीन शक्तिपीठांचे सार्मथ्य महाराष्ट्राच्या भूमिकाही लाभले आहेत. अनादी काळापासून देवी स्वरूपातील या शक्तीची उपासना केली जाते. त्यामध्ये केले जाणारे उपास-तापास, व्रत-वैकल्ये नऊ दिवसांकरिता घाटांची स्थापना केली जाते. 

नऊ माळा अर्पण केल्या जातात. अनेक ठिकाणी देवीच्या कृपेचे महत्त्व सांगणारे सप्तशतीचा पाठांचे वाचन होत असते. अष्टमी ते दशमी या नवरात्राच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर यज्ञ यागांचेही आयोजन होत असते. त्या त्या परिसरामध्ये आणि सामाजिक परिस्थितीतून देवीची वेगवेगळी नावे रूपे ऐकायला आणि पाहायला मिळत असतात. परंतु देवी कुठलीही असो तिची साधारणपणे तीन रूपे भक्तांनी आपल्या मनामध्ये साकारलेली दिसून येतात. महाकाली, महासरस्वती, आणि महालक्ष्मी अशी त्यांची तीन रूपे सांगितली जातात. शक्ती, विद्या आणि संपत्ती यांच्या समानव्ययातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अशा सर्वांचेच संरक्षण करण्यासाठी या शक्तिरूप देवींची आराधना सांगितली गेली असावी. 

भारतीय संस्कृतीत याबाबत उपलब्ध असलेली विविध पुराणे किंवा प्राचीन वाड्मय यांचा आढावा घेतला तर निर्मिती आणि सृजनता हा त्यामधला एक स्थायिभावसुद्धा नजरेसमोर येतो. सगळ्या सृष्टीची निर्मिती ही अशाच शक्ती रूपातून झाली आह आणि त्याचे संवर्धन व्यवस्थाही निर्माण केली गेली. या सगळ्या विश्‍वरचनेचा पसारा कुठल्यातरी दैवी शक्तीचा अविष्कार असल्यामुळेच त्या शक्तीचे स्वरूप आपल्या अल्प बुद्धीप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ते स्वरूप अर्मयाद असल्यामुळेच तितक्याच नम्रतेने या शक्तीपुढे शरण जाणे असाही एक भाव त्यातून व्यक्त केला गेला आहे. ज्याला आपण नवरात्र म्हणतो त्या काळात नऊ दिवस जागरण करण्याची एक पद्धत रूढ झालेली दिसून येते. देवीचे स्वरूप तिची शक्ती आणि कार्य यांचे संदर्भ पाहिल्यानंतर तमोगुणी, दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन करायचे असेल तर रात्रीच्या अंध:कारामध्ये सज्जन शक्तीचे दर्शन घडले पाहिजे. 

एवढेच नव्हे तर त्याचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. ज्या अंध:कारामध्ये दुष्टप्रवृत्ती किंवा तमोगुण उफाळून येतात त्या काळात या सज्जन शक्तीचे जागरण करण्याची ही परंपरा पडली असावी. उपलब्ध साहित्यातसुद्धा म्हणजेच अगदी सप्तशती, देवीभागवत किंवा महाराष्ट्रातल्या या शक्तिपीठांचाही इतिहास पाहिल्यानंतर आसुरी प्रवृत्तींचा त्यांनी नाश केल्याचे आढळून येते. म्हणूनच महिषासुरर्मदानीचे हे रूप शक्तीच्या आराधनेसाठी प्रतिकात्मक मानले जाते. याच्या जोडल्या गेलेल्या कथांमधून त्या त्या देवींचे वेगवेगळे रूप भक्तांनी साकार केले आणि मग कुठे त्याला दुर्गा, अंबा, चंडिका अशी वेगवेगळी नवे दिली गेली. 

त्या सर्वांचा तुलनात्मक परंतु एकत्रित निष्कर्ष एवढाच निघतो की व्यक्ती किंवा समाजामध्ये तीन प्रकारच्या शक्ती जपण्याची आवश्यकता व्यक्त झालेली दिसून येते. या तीन गोष्टी जर असतील तर समाजामध्ये किंवा व्यक्तींमध्ये समाधान आणि संपन्नता नांदू शकते. बलहीन आणि शक्तिहीन समाज काहीच करू शकत नाही. अशा या शक्तीची निर्माती म्हणून देवीरूपाला शरण जाण्याची आवश्यकता सांगितली गेली. 

No comments:

Post a Comment