Saturday 22 September 2018

भारतातील तळीरामांची संख्या

भारतातील मद्यपींची संख्या २00५ च्या तुलनेत २0१६ मध्ये दुपटीने वाढल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. २00५ मध्ये देशात प्रतीव्यक्ती २.४ लिटर मद्याची विक्री होत होती, तर २0१६ मध्ये हे प्रमाण ५.७ लिटरवर पोहचले आहे. म्हणजेच या काळात मद्य विक्रीचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यात ४.२ लिटर मद्य पुरुष तर १.५ लिटर मद्य महिलांनी घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.
२0२५ पर्यंत या प्रमाणात अधिक वाढ होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व आशियात मद्यपींच्या संख्येत सर्वाधिक वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतातच ही वाढ प्रतिव्यक्ती २.२ लिटरने वाढण्याची शक्यता आहे. भारतात एक मोठा वर्ग आहे. त्यातील अनेकजण आरोग्याला हानीकारक असलेली तसेच अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली दारु घेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. इंडोनेशिया आणि थायलंडमध्येही अशा प्रकारच्या मद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. तर चीनमध्येही प्रतिव्यक्ती 0.९ लिटर वाढ होण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे.
अल्कोहोलमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. अल्कोहोलमुळे माता आणि बालकांचे आरोग्य, संक्रमणाने होणारे रोग, साथीचे रोग होतात. तसेच मानसीक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जगात २0१६ मध्ये ५.३ टक्के म्हणजे सुमारे ३0 लाख लोकांचा मृत्यू अल्कोहोलमुळे ओढवला आहे. अल्कोहोलमुळे २00 पेक्षा अधिक रोग होण्याची शक्यता वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या मद्यापासून लांब राहण्याचा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.

1 comment:

  1. Why government not taken action bhartala he sagle Konya dishela nenar ahet

    ReplyDelete