Sunday 30 September 2018

गजानन दिगंबर माडगूळकर


अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर. कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात त्यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा, संवाद, गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले.
आरंभी ते वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. 'वैशाखी' या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाड्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबर्‍या व युद्धाच्या सावल्या हे नाटक, इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८0 पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १0 हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद, यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला. गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल.गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

No comments:

Post a Comment