Saturday 29 September 2018

अँनी बेझंट

अँनी बेझंट (१ ऑक्टोबर १८४७ ते २0 सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा आदी क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटीश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु, त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना र्जमन, फ्रेंच आदी भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. पुढे रेव्हफ्रँक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु, मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले (१८७३). त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला (१८७४). नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावित होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३-९१) यांच्या 'नॅशनल सेक्युलर सोसायटी' मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, महिलांचा मतदानाचा हक्क आदींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. १८८५ साली त्या 'फेबिअन सोसायटी'च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणार्‍या ७00 मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. या काळातील समाज सुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले. थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम हेलेना ब्लाव्हॅट्स्की (१८३१-९१) यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला (१८८९). त्यांच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्स्की यांचे शिष्यत्व पत्कारले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. १८९३ साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून र्शोत्यांची हृदये हेलावून सोडली. त्या १८९३ साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही, तरी र्शद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे आदींवर अनेक व्याख्याने दिली. १९0५मध्ये त्यांनी गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले .

   

No comments:

Post a Comment