Saturday 29 September 2018

हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी

हवेच्या प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी होत असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. वायू प्रदूषण आणि वायू प्रदूषण आणि आयुष्यकाळ यांच्यातील संबंधाची पाहणी करणारे हे पहिलेच संशोधन होय. जोशुआ आपटे यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले असून एन्व्हायर्मेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधकांनी वातावरणात आढळणार्‍या २.५ मायक्रॉनपेक्षा छोट्या कणांमुळे (पीएम) होणार्‍या वायू प्रदूषणाचा अभ्यास केला. हे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात आणि यामुळे हृदयाघात, अपस्मार यांसारखे तसेच कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. पीएम २.५ प्रदूषण वीजनिर्मिती प्रकल्प, कार व ट्रक, आग, औद्योगिक उत्सर्जनातून होते.
या प्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय १.५३ वर्षांनी कमी होते, असे संशोधकांना आढळले. त्या तुलनेत बांग्लादेशात १.८७ वर्ष, इजिप्तमध्ये १.८५, पाकिस्तानात १.५६, सौदी अरेबियात १.४८, नायजेरियात १.२८ आणि चीनमध्ये १.२५ वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याचेही त्यांना आढळले. वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये तर सजग नागरिक मास्कचा वापर करताहेत. पण, सर्वसामान्यांसाठी ही बाब अजूनही सरावाची झालेली नाही. त्यामुळे वायू प्रदूषणाला अटकाव करणे हा एकमेव पर्याय प्रशासन आणि नागरिकांसमोर राहतो. त्यातही वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी कसे करता येईल यासाठी शासन स्तरावर विचार होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment