Wednesday 26 September 2018

देव आनंद

   
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. सरकारने त्यांना २00१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर २00२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला हम एक है या चित्रपटाने सुरुवात झाली. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी बाँलिवूडवर ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आणि ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूडमधील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना होत असे.

No comments:

Post a Comment