Saturday 29 September 2018

महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ मृत्यू ३0 जानेवारी १९४८) ऊर्फ मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. १८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. त्यांना बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. ते १८८८ मध्ये इंग्लंडला गेले. यावेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. ते १0 जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. गांधीजी आफ्रिकेत २0 वर्षे राहिले. दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. गांधीजींनी स्वत: अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु, आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र सुरू केले. १८९६ च्या जून महिन्यात गांधीजी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्यासाठी तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकिकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९0३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९0७ मध्ये उग्र रूप आले. १९0८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहार्शम स्थापन केला. आर्शमात राहणार्‍या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापार्‍यांनी आर्शमास देणग्या देण्याचे बंद केले. आर्शम बंद पडण्याची वेळ आली. परंतु, गांधींनी अस्पृश्यांना आर्शमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. गांधींनी १९१७ मध्ये शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. र्जमनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले; ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली.

No comments:

Post a Comment