Tuesday 25 September 2018

शास्त्रज्ञ - डॉ. कमला सोहोनी

आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञान क्षेत्रात प्रवेश मिळवलाच आणि याच क्षेत्रात आपल्या नव्या संशोधनाने सर्वांची वाहवा मिळवत भारतातील महिला शास्त्रज्ञ बनण्याचा मानदेखील मिळवला. ही धडाडीची स्त्री अर्थातच ज्येष्ठ विदुषी लेखिका दुर्गाताई भागवत यांची बहीण डॉ. कमला सोहोनी. कमलाताईंचा जन्म 18 जुलै 1911 चा. इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला. 1933 मध्ये रसायनशास्त्र विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बीएस्सी उत्तीर्ण झाल्या. वर्तमानपत्रातील जाहिरातींनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्यांनी अर्ज केला. कमलाबाई प्रवेशासाठी पूर्णपणे पात्र होत्या. परंतु संस्थेचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी मुलगी असल्याने त्यांना प्रवेश नाकारला; परंतु कमला रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या. मुलगी म्हणून अन्याय सहन करणार नाही असं ठामपणे सांगत ज्या काळात स्त्री शिक्षणासारख्या अत्यंत मूलभूत हक्कापासून वंचित होती. चार भिंतीमध्येच तिचं जगणं बंदिस्त होतं. अशा कठीण, कर्मठ काळात शिक्षणाची जबरदस्त इच्छा, आवड असणार्‍या एका स्त्रीने विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रज्ञ बनण्याची आणि याच क्षेत्रात संशोधन करण्याची मनीषा बाळगली. ही अनाकलनीयच गोष्ट होती. स्वाभाविकच महिला आणि शास्त्रज्ञ ही गोष्टच तत्कालीन पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेलाही रुचणारी नव्हती; परंतु याच स्त्रीने त्यांनी एमएस्सी करता प्रवेश मिळवला. त्यांनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षाअखेर रामन त्यांना म्हणाले, तुझी निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते, की यापुढे या संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा. याचाच अर्थ कमलाबाईंनी ही जिद्दीची परीक्षा पास केली होती. पुढे 1937 साली मुंबई विद्यापीठात स्प्रीमेंट रिसर्च आणि सर मंगलदास नथ्थुभाई या शिष्यवृत्त्या मिळवून त्या इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लायब्रोटरीचे डायरेक्टर नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक गॉल्डन हॉपकीन्स यांना भेटून त्यांनी मोठ्या कष्टाने प्रवेश मिळवला. याच विद्यापीठातून प्राणिमात्रांप्रमाणेच सर्व वनस्पतींनाही सार्‍या जीवनक्रिया सायटोक्रोन सीच्या मध्यस्थीने एन्झाईन्समुळे करता येतात या विषयावर संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. पुढे इंग्लंडमध्ये आपल्या संशोधनाचा वापर न करता त्या मायदेशात परतल्या आणि मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन करतच निदेशक म्हणून निवृत्त झाल्या. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनण्याचा मान मिळवणार्‍या डॉ. कमला सोहोनी यांची ही संघर्षगाथा ऐकल्यानंतर त्यांच्या ठायी आजच्या काळातील देवी भवानीचंच रूप आपल्याला दिसतं.

No comments:

Post a Comment