Saturday 2 May 2020

शंकरराव खरात

माणसाच्या प्रतिष्ठेला आणि स्वातंत्र्याला महत्त्व देणारा कथाकार म्हणजे  शंकरराव खरात.  माणसांनी भोगलेल्या व्यथावेदनांवर लिहिताना त्यांच्या लेखणीनं कधी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. भटक्या विमुक्तांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी झिजवली. वेशीबाहेर राहणाऱ्या माणसांच्या सुख-दुःखावर लिहितानाही त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि द्रष्टा विचारवंत सजग होता. सांगली जिल्ह्यातल्या  आटपाडी येथे  १८ जुलै १९२१ जारोजी शंकररावांचा जन्म झाला.
दारिद्रय आणि जातीयतेच्या भीषण अनुभवांचा वारसा त्यांना जन्मापासूनच लाभलेला. वडील मरणाचा सांगावा पोहोचविण्यापासून सरणासाठी लाकडं  काढून देण्यापर्यंत आणि गावात दवंडी देण्यापासून ते सडलेल्या निराधार मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापर्यंतची सारी कामं करत, शंकरराव या साऱ्यात वडलांसोबत असत. पुढे वडलांना तराळकी मिळाली तरी बालपणातल्या अशा दाहक अनुभवांमुळे प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं जीणं जगता यावं म्हणून डॉ. आंबेडकरांच्या लढ्यात  ते सहभागी झाले. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची  पताका अखेरपर्यंत खांद्यावर मिरवली.
आटपाडी येथील खरात यांचे घर
गावकुसाबाहेर जगणान्या समाजबांधवांचं उपेक्षित जीवन हा त्यांच्या सहानुभूतीचा विषय झाला. अशातच त्यांना 'बाबासाहेब आंबेडकर' नावाचा परिसस्पर्श झाला. ते लिहिते झाले. 'नवयुग'मध्ये त्यांनी पहिली कथा लिहिली ती १९५६ मध्ये. शंकरराव मग लिहितच राहिले. या लेखनामागं होती खडतर तपश्चर्या आणि तपश्चर्या करत राहा. प्रकाश मिळेल' हा कर्मवीर भाऊरावांनी दिलेला संदेश. आटपाडी ते औंध आणि कोल्हापूर ते पुणे असा त्यांचा शिक्षणप्रवास. भाऊरावांचा आणि बाबासाहेबांचा सहवास. त्यांच्यातील कार्यकर्ता घडला तो याच काळात. ते वकील झाले. दीनदलित आणि उपेक्षितांबद्दलचा जिव्हाळा आणि उमाळा त्यांच्या लेखणीतून पाझरू लागला. 'सतूची पडीक जमीन' ही त्यांची पहिलो कथा.
'माणुसकीची हाक' या त्यांच्या पहिल्या कादंबरीनं त्यांच्याकडं जाणत्यांचं लक्ष वेधलं. आचार्य अत्रे आणि शिरीष पै यांनी आपल्याला लेखक म्हणून उभ केलं याची जाणीव शंकररावांनी अखेरपर्यंत ठेवली. अकरा कथासंग्रह शेकडो लेख आणि 'तराळ अंतराळ' हे आत्मवृत्त ही त्यांची साहित्य संपदा, 'टिटवीचा फेरा', 'बारा बलुतेदार','सांगावा,' 'तडीपार' हे त्यांचे सर्वमान्य कथासंग्रह. नव्या समाजरचनेसाठी त्यांनी पोटतिडकीनं केलेल्या धडपडीतून दिसतं ते त्यांचं समाजशील व्यक्तित्व. कुठंही आक्रस्ताळेपणा नाही की उरबडवेपणा नाही. भडकता नाही की कृत्रिमता नाही.
खरातांनी आंबेडकरांच्या सहवासात अठरा वर्षे काढली. 'प्रबुद्ध भारत' आणि 'दलितबंधू'चं संपादनही केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून बँक ऑफ इंडियाच्या संचालक पदापर्यंत आणि रेल्वे सर्विस कमिशनच्या अध्यक्षपदापासून ते डॉ. अबिडकरांच्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंत अनेक पदं भूषविली तरी त्यांच्या साधेपणावर आणि सच्चेपणावर एकही
ओरखडा उठला नाही. ते निष्कलंक जगले. जळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडं चालून आलं. सामान्य माणूस हाच आपल्या लेखणीचा प्राण मानणारा हा कथाकार  ९ एप्रिल २००१ मध्ये शांत झाला,
साहित्य शारदेच्या अंगणात वेदनेचा हुंकार उमटवून गेला.

No comments:

Post a Comment