Sunday 24 May 2020

संगीतकार लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बर्‍याचदा लक्ष्मीकांतजींना चाल लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय.
सरगमचे परबत के उस पार, खलनायकचे चोली के पीछे क्या है, हम पाँचचे आती है पालखी सरकार की, एक दूजे के लिएचे हम बने तुम बने, हमचे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी चित्रपट संगीताला सुरुवात केली तेव्हा शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, रोशन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, सलिल चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी यांचा विलक्षण दबदबा होता. साधा शिरकाव करणे अवघड होते, पण यांनी तर आपली जागा निर्माण केली. पहिल्याच पारसमणी चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. अशा फॅण्टसी चित्रपटाला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे संगीतकाराला नाव ते काय मिळणार? हरिश्‍चंद्र तारामती, संत ज्ञानेश्‍वर अशा चित्रपटांना संगीत देऊन फार काही साध्य होणारे नव्हते. संत ज्ञानेश्‍वरमधील ज्योत से ज्योत जलाते चलो हे गाणे गाजले. १९६४ साली फिल्म फेअरच्या स्पर्धेत संगमच्या शंकर-जयकिशनवर मात करून दोस्तीसाठी लक्ष्मीकांत-प्यारेलालनी बाजी मारली आणि चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यमे या तिन्ही घटकांचे या जोडीकडे लक्ष गेले व ते बराच काळ राहिले. दोस्तीतील मेरा ज्यो भी कदम है, राही मनवा दुख की चिंता, तेरी दोस्ती मेरा प्यार अशी सगळीच गाणी हिट ठरली. सिनेमाच्या जगात यशासारखे सुख नाही, पारितोषिकासारखे टॉनिक नाही व वाढत्या मागणीसारखा आनंद नाही. लक्ष्मी-प्यारे यांचा चौफेर संचार सुरू झाला, त्याचे साम्राज्यात कधी रूपांतर झाले हेदेखील समजले नाही. प्यार बाटते चलो, अजनबी तुम जाने पहचाने यह दर्द, भरा अफसाना कैसे रहू चूप की मैने दिल खिल प्यार ब्यार असे करीत करीत मिलन, दो रास्ते, मेरे नसीब अशा चित्रपटांच्या वेळी त्यांनी खूपच मोठी मजल मारली. त्या काळातील त्यांच्या चित्रपटात आये दिन बहार के, कर्ज, पत्थर के सनम, तकदीर, इज्जत, मेरे हमदम, मेरे दोस्त, राजा और रंक, अंजाना, आया सावन झुमके खूप महत्त्वाचे. भारतीय संगीत व विदेशी संगीत यांची युती करताना त्यांनी बर्‍याचदा लोकसंगीतावर भर दिला, तर अनेकदा चित्रपटाचे स्वरूप अर्थात मागणी पाहून चाली बांधल्या.
राज कपूर, मनोजकुमार, राज खोसला, मोहनकुमार, चेतन आनंद, विजय आनंद, मोहन सैगल, मनमोहन देसाई, राजकुमार कोहली, जे. ओम प्रकाश, सुभाष घई, के. बालचंदर, बी. आर. चोप्रा, रवी टंडन, दुलाल गुहा, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती, शक्ती सामंता अशा कितीतरी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत देत आपले आसन बळकट केले, सुभाष घईच्या वैभवात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा वाटा खूप मोठा आहे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पयर्ंत टिकलेली होती. या जोडीने बॉलीवुड मध्ये ३५ यशस्वी वर्ष काम केले, ६३५ चित्रपटातील ३५00 च्या वर गाण्यांना संगीत दिले. व तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली. संगीतकार मा. मा.लक्ष्मीकांत यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment