Sunday 24 May 2020

तोरणमाळ

फिरायला गेल्यावर गर्दी, गजबजाट नकोसा वाटतो. प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर लोकांची गर्दी झालेली असते. त्यामुळे एखाद्या अपरिचित, ऑफबीट ठिकाणाचा शोध घेतला जातो. असंच एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातलं सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. इथे गोरक्षनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे. तोरणमाळच्या आसपास पहाण्यासारखं बरंच काही आहे. इथून दीड किलोमीटर अंतरावर सीता खाई आहे. इथे काही काळ घालवता येईल. ही दरी लक्ष वेधून घेते. इथला धबधबा हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. 

कमळ तलावात भरपूर कमळं पहायला मिळतात तर यशवंत तलावही लक्ष वेधून घेतो. मच्छंद्रनाथ गुहा ही नैसर्गिक पद्धतीने तयार झाली असून इथे मच्छिंद्रनाथांनी ध्यानधारणा केली होती. त्यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतं. इथल्या खडक पॉईंटवर ट्रेकिंग करता येतं. इथून तोरणमाळचं विहंगम दृश्य दिसतं. मध्य प्रदेशच्या सीमेवरचा आवशाबारी पॉईंटही गर्दी खेचतो. यासोबतच कॉफी गार्डन, सनसेट पॉईंट नागार्जुन पॉईंट अशी ठिकाणंही आहेत. 
तर अशा या तोरणमाळला जाण्यासाठी शहादाला उतरता येईल. शहादाहून तोरणमाळ ५५ किलोमीटरवर आहे. नाशिकहूनही शहादाला जाता येईल. सुरतहून शहादा २00किलोमीटरवर आहे. धुळे, चाळीसगाव या रेल्वेस्थानकांवरूनही या ठिकाणी पोहोचता येईल.

No comments:

Post a Comment