Friday 22 May 2020

राजा राममोहन रॉय

बालविवाह, सती प्रथेच्या जोखडातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता आंदोलन उभारणारे व भारतात उदारमतवादी आधुनिक सुधारणांचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजा राममोहन रॉय २४६व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल साकारून त्यांच्या कार्याला सलाम केला होता.
२२ मे १७७२ साली पश्‍चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अभ्यास घरीच झाला.
वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. चिकित्सक वृत्तीच्या राजा राममोहन रॉय यांनी र्शुती, स्मृती, पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास केला. या विषयांचे तुलमात्मक अभ्यास करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. परंतु, तत्कालीन समाजाला त्यांचे हे विचार मान्य नव्हते. त्यामुळे, आपल्या धर्मविषयक व ईश्‍वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २0 ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
भारतीय समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था पाहून व्याकूळ झालेल्या राजा राममोहन रॉय यांनी भारतातील क्रूर आणि जाचक अशा सती प्रथेला मूठमाती देण्यासाठी मोठा लढा उभारला. जिथे कुठे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकार्‍यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करत असत. त्यामुळे समाज त्यांना हिंदू धर्मविरोधी मानू लागला. त्यांच्यावर टीकाही झाली. परंतु, स्त्रियांचे खून पाडणारी ही प्रथा बंद पाडण्यात यावी, त्यासाठी योग्य तो कायदा करण्यात यावा यासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांना कायदेशीर अर्ज दिला. लॉर्ड बेंटिक यांनीदेखील राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून ब्रिटिश सरकार दरबारी अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खूश होऊन त्यांना राजा हा किताब दिला.
भारतीयांना आधुनिक पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. त्यांनी विविध विषयांवरील अनेक पुस्तकं लिहिली. त्यांच्या वेदान्त ग्रंथ मुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. २७ डिसेंबर १९३३ साली आजारपणामुळे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment