Friday 1 May 2020

नेहरू उद्यान कोयनानगर, सातारा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले कोयना धरण प्रसिद्ध आहे. या कोयना धरणाजवळच सुंदर उद्यान आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव या उद्यानाला देण्यात आले आहे. कोयना धरणाच्या पश्चिमेस शिवसागर जलाशयाच्या काठावर असलेल्या टेकडीवर हे भव्य उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानातील पंचधारा घुमट हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पंडित नेहरू यांच्या पंचशील तत्त्वांचे स्मरण घुमट करून देतो. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी अद्ययावत खेळणी उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे, उद्यानात विविध प्रजातींचे वृक्ष व वेली असून रंगीबेरंगी फुलेही पर्यटकांचे मन जिंकून घेतात. कोयना धरण वीज निर्मितीसाठीही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे उद्यानात वीजनिर्मिती प्रकल्पाची ओळख करून देणारे यशोगाथा केंद्रही उभारले आहे. हे उद्यान टेकडीवर असल्याने उद्यानातून कोयना धरण व आसपासचा परिसराचे सुंदर दृश्यही पाहता येते.

इथे काही दुर्मिळ वनस्पतीही आहेत. त्यापैकी काही वनस्पतींचा औषधी उपयोगही केला जातो. त्याचप्रमाणे त्या संशोधनासाठीसुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे आयुर्वेदिक दृष्टिकोणातूनही त्या महत्त्वाच्या आहेत. या उद्यानातील सर्व वनस्पतींचे मूळ पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतच आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये कोयनेचा समावेश होतो. ते कोयना नदीवर बांधले असून ती महाबळेश्वरला उगम पावते. प्रामुख्याने जलविद्युत निर्माण करण्यासाठी या धरणाची निर्मिती झाली. कोयना धरण परिसराला 1967 च्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यानंतरही भूकंपाच्या छोट्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे.
कोयना धरणाच्या परिसरात वन्यजीव अभयारण्य असून या अभयारण्याला 'युनेस्को' ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. पश्चिम घाटामध्ये पसरलेले हे अभयारण्य 423 चौरस किलोमीटर पसरलेले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा उत्तरेकडील भागही याच अभयारण्यात येतो. या अभयारण्यात वाघासह इतरही वन्यप्राणी आहेत. सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या धरणाच्या परिसरातील नवजा धबधबा, ठोसेघरचा धबधबा, प्रतापगड किल्ला आदींचा यात समावेश होतो. याच जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात सप्टेंबरमध्ये आकर्षक फुलांनी फुललेले कास पठार पाहायलाही पर्यटक गर्दी करतात.

No comments:

Post a Comment