Wednesday 27 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा २८ मे १८८३ रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या २0 व्या वर्षी लिहिले.
पुण्याला फग्यरुसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. ९ जून १९0६ मधे लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषात भाषांतरे होऊन देशभक्त क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. १९0९ मधे बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हु. अनंत कान्हेरे या क्रांतीकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरीसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भितीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले. काळ्यापाण्यातून सुटका होऊन र%ागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहोजन, पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. १९३७ ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९४0 मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतीकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १0 मे १९५२ ला केली. २२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर अ. भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता. आयुष्याचा क्षण न् क्षण आणि शरीराचा कण न् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. महर्षी व्यास-वाल्मिकींच्या कुळातला अमर साहित्यकार व हाडाची काडे करणारा आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने प्रायोपवेशन करून (अन्नत्याग करून) २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये देहत्याग केला !

No comments:

Post a Comment