Saturday 9 May 2020

दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. त्यांचा जन्म ९ मे, १८१४ रोजी झाला. हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.

दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने फाश्री आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट झाले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत असिस्टंट टीचर ह्या पदावर कामाला लागले. १८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वत:लाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वत: दादोबांनीच प्रकाशित केली. १८५0 साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली. १८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पयर्ंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पयर्ंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या. दादोबांच्या मृत्यूपयर्ंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या. ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपयर्ंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठय़ा महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठय़ा व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत. दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने मराठी भाषेचे पाणिनी हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापयर्ंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वायात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच, शिवाय त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वत: दादोबांचे जीवन अश्या काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.
या आत्मचरित्राचे दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.
दादोबा पांडुंरंग यांचे चरित्र (अ.का. प्रियोळकर), दादोबा पांडुरंग तर्खडकर - व्यक्तित्व आणि कर्तृत्व (रजनीश जोशी) आदी पुस्तके प्रसिध्द आहेत.

No comments:

Post a Comment