Friday 15 May 2020

संत मुक्ताबाईंनी दिली मोठय़ा भावांना मायेची पाखर

ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्‍विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२0१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच नवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहीण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली.
आपल्यानंतर आपली मुले तरी सुखी राहावीत, या आशेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्राय:श्‍चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले. मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच सर्मथपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते.
मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरू म्हणजे तिचेच मोठे बंधू संत नवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत. मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदु:खाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परम भक्त, ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडांना भेटले असता, नवृत्तीसह दोघाभावांनी नामदेवांना वंदन केले; परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले. मुक्ताबाईंनी मात्र नामदेवांचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही, दर्शन घेतले नाही. उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात तिने नामदेवाची कानउघाडणी केली.
मुक्ताबाईंनी केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी गुरू माउलीच्या आशीर्वादासाठी विसोबारायांकडे मार्गक्रमणा केली. त्यानंतर नामदेव ज्ञानदेवादी भावंडांच्या सान्निध्यात राहू लागले. त्यांनी गावोगावी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशा ईर्षेने यात्रा केल्या. त्यांच्या अभंगगाथा म्हणजे भावभक्तीचा नम्रमधुर ठेवा आहे. त्यावर मुक्ताबाईंच्या वत्सल स्नेहाचा अवीट ठसा उमटलेला आहे. यानंतर असेच ज्ञानदेवादी भावंडे त्र्यंबकेश्‍वरावरून पुन:श्‍च परतीच्या अलंकापुरीच्या वाटेवर असताना पुण्यस्तंभ पुणताम्ब्याजवळ पोहोचली. त्या ठिकाणी गोदातटावर महातपस्वी चांगदेवाचा निवास होता. गुहेत त्यांची समाधी लागलेली होती. गुहेच्या भोवती काही मृत शरीरे लिंबाच्या पाचोळ्याखाली झाकून ठेवलेली या भावंडांना दिसली. समाधी उतरल्यानंतर चांगदेव महाराज त्या प्रेतांना जिवंत करणार अशा आशेने मंडळी वाट पाहत बसलेली होती. ज्ञानदेवांनी त्या मंडळीची तितिक्षा पाहून कृपावंत होऊन मुक्ताबाईस संजीवनी मंत्र कथन केला. हे सिद्धीसार्मथ्य पाहून चांगदेव ज्ञानदेवांना शरण आले. त्यांनी चांगदेवांना मुक्ताबाईकडे गुरुपदेश मागण्यास सांगितले. मुक्ताबाईंनी शिष्य म्हणून चांगदेवाचा स्वीकार केला.
ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एका मागोमाग एक अशा शके १२१८ मध्ये समाध्या घेतल्या तेव्हा नवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्यथा-व्याकूळ झाले, उदासीन झाले. मुक्ताई अबोल व उदासी बनली. दु:खी कष्टी अवस्थेत मुक्ताबाई महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहून येथे आल्या. वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी वीज कडाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे. ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्‍वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय.

   

No comments:

Post a Comment