Friday 4 September 2020

ब्रह्मकमळ: फुलाचं सौंदर्य एका रात्रीचं


ब्रम्हकमळाचे  फूल कापसाच्या मोठ्या बोंडासारखं दिसत असतं. ब्रह्मकमळ पानफुटी प्रकारात मोडतं.  पानाच्या कंगोऱ्यातून बारीक कोंब येतो.   हँडमेड पेपरच्या जाडीच्या पानाच्या  कडेवर असलेल्या एका कंगोऱ्यातून- म्हणजे जणू  एका बिंदूमधून ही कळी येते. त्यामुळे आपल्याला  वाटतं की, ही कळी वाढून वाढून किती वाढणार?  आणि त्यातून कितीसं मोठं फूल येणार? देठाच्या  टोकाला कळी आलेली आपण नेहमी बघतो. मात्र ब्रह्मकमळाची तऱ्हा उलटी आहे. आधी कळी  येते, मग देठ येतो! इतर फुलांच्या कळ्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन वरच्या दिशेला वाढतात. ब्रह्मकमळाची कळी  मात्र गुरुत्वाकर्षणाच्या म्हणजे जमिनीच्या दिशेने  वाढते. कळीचा पानावर पडणारा भार हलका  करण्यासाठीच जणू निसर्गाने ही व्यवस्था केली  असावी. कळी जशी मोठी होत जाते, तसा तिचा  देठही लांब व जाड होत जातो. ही कळी व देठ अजून किती वाढणार? कळी अजून किती खाली  जाणार? आपल्याला असे प्रश्न पडत असतानाच  कळी एकदम 'घुमजाव' करते. देठ एक डौलदार  वळण घेऊन कळीला इतर फुलांच्या कळ्यांसारखं वरच्या दिशेने वळवतो. पान आता जणू नववा महिना लागलेल्या गर्भवतीसारखं अवघडलेलं असतं. आणखी दोनतीन दिवस जातात, कळी आल्यापासून साधारणपणे २१ दिवसांनी ती फुलते. कळीवरची गुलाबी दल जराशी बाजूला करून आतल्या पहिल्या पाकळ्या त्यातून डोकवायला लागल्या की समजायचं- आजची रात्र ब्रह्मकमळाची आहे.

रात्री ८-९ च्या सुमारास कळी उमलायला लागते. ती मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण उमलते. हातभर लांबीच्या पानाच्या कडेतून आलेला करंगळीच्या जाडीचा देठ, त्याच्या टोकाला मुठीएवढी कळी आणि त्यातून ओंजळीएवढं फूल! रात्री फुलणाऱ्या इतर फुलांप्रमाणेच हे फूलही पांढरेशुभ्र असून त्या फुलांसारखाच यालाही मोहक सुवास असतो. पाकळ्या नाजूक आणि पारदर्शक असतात.  ब्रह्मकमळाला दरवर्षी फूल येतंच असं नाही. आणि आलं तरी ते शक्यतो पावसाळ्यातच येतं. त्यामुळे वर्षभर किंवा कधी कधी अनेक वर्ष नेमाने पाणी घालून नुसती पानंच सांभाळावी लागतात. पण एकदा जरी त्याला फूल आलं तरी आपली चिकाटी आणि प्रतीक्षा सार्थकी लागते. काहीजण या फुलाला लक्ष्मीचं प्रतीक मानून, हळद-कुंकू वाहून त्याचं औक्षण करतात. हे सारं सौंदर्य फक्त एका रात्रीचं! फूल झाडावर राहिलं तर दुसरा दिवस उजाडेपर्यंत ते कोमेजून जातं. उद्या सकाळी देवाला वाहू किंवा आज येऊ न शकलेल्या मित्राला उद्या दाखवू, असं ठरवलं असेल तर पूर्ण फुललेलं फूल मध्यरात्रीनंतर तोडून फ्रिजमध्ये ठेवावं लागतं. पण ज्या रात्री ते फुलतं, त्या रात्रीच ते बघण्याची मजा और असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment