Saturday 5 September 2020

आशा भोसले


आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्‍वगायन केले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता, हृदयनाथ आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कर्‍हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५0 च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाही. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वत:ला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. सुरुवातीला त्यांना गायनात अजिबात रस नव्हता. घरात संगीत शिक्षण दिले जात असताना त्यांचे तिकडे लक्ष नसे. त्या खेळण्यात अधिक दंग असायच्या. मात्र लग्नानंतर त्यांना परिस्थितीने गायला भाग पाडले. आणि सतत सराव, मेहनत या जोरावर त्या एक लोकप्रिय गायिका बनल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्‍वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले. १९५७- १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. तेव्हापासून आज तागायत त्या गातच आहेत. आजही त्या गायनाचा सराव करतात.

No comments:

Post a Comment