Friday 4 September 2020

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील चितूर जिल्हय़ातील तिरूपाणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूलमध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व एम. ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९१७ पर्यंत कार्य केले. १९३९मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. १९३१ साली इंग्लंडने डॉ. राधाकृष्णन यांना 'सर' ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे १९४६ते १९४९ या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली. १९५२ साली पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. १९३९ ते ४८ मध्ये बनारस हिंदू विश्‍वविद्यालयाचे कुलपती होते. १९५७ च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना १९५८ साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. १३ मे १९६२ रोजी डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. १९६७ साली नवृत्त झाले. त्यानंतर तिरूपती या गावी १७ एप्रिल १९७५ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

पाश्‍चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे. राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती? कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनयांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले.

No comments:

Post a Comment